
नगर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत असणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना सरकार नेमकी आश्वासने देत तरी का? असा प्रश्न कधीकधी उपस्थित होतो. कारण एकीकडे सरकार कुणबी नोंदी शोधून दिल्या जात आहे असं म्हणतंय तर आता कुणबी जात प्रमाणपत्रे (Kunbi Caste Certificates) अवैध ठरवून ती रद्द करण्यात आल्याच्या तक्रारी जरांगे पाटलांकडे येत आहेत. या मुद्द्यावरून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील प्रचंड संतापले आहेत. अंतरवाली सराटी येथे कुणबी प्रमाणपत्र रद्द झालेल्या लोकप्रतिनिधींनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर अतिशय बोचऱ्या शब्दांत टीका करत गंभीर आरोप केले आहेत. आता नेमकं ते काय म्हणालेत ते जाणून घेऊ…
नक्की वाचा : ‘नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही’ – तुकाराम मुंढे
‘माझ्याविरोधात मोठा कट रचला जातोय’ (Manoj Jarange Patil)
जरांगे पाटील यांनी माध्यमांना सांगितले की, “माझ्याविरोधात मोठा कट रचला गेला असून सरकारकडून मराठ्यांचे वाटोळं सुरू आहे. मला एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण या संपूर्ण कटाचा मी लवकरच पर्दाफाश करणार असून सगळी माहिती बाहेर आणणार आहे. भाजपमधील मराठा नेत्यांनीही हे लक्षात ठेवावे, हे तुमच्याच मुलांच्या भविष्याच्या विरोधात आहे. आमच्या मुलांच्या नरडीचा घोट घेणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही, २०२९ च्या निवडणुकीत या सगळ्याचा हिशोब केला जाईल, असा इशाराच त्यांनी दिलाय.
अवश्य वाचा : राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेला विरोध का? खंडपीठातील याचिकेमागचे कारण काय?
दहिहंडे प्रकरणाचा दाखला देत जरांगे यांनी सांगितले, “यशवंता दहिहंडे यांची उर्दूतील नोंद दोन वर्षांपूर्वी सापडली होती. शिंदे समितीने ती नोंद ग्रामपंचायतीच्या भिंतीवर लावली. त्यांच्या नातवाने (भाऊसाहेब) कुणबी प्रमाणपत्र मिळवले आणि त्यांच्या पणतूने पॉलिटेक्निकला कुणबी कोट्यातून प्रवेश घेतला. आता त्याच्या ॲडमिशनचे काय करणार? दहिहंडे आडनावाचे ३,००० लोक आहेत, आता या सर्वांचे प्रमाणपत्र रद्द करणार का?”, असा सवाल जरांगे यांनी केला.
आपला पक्षाचा उमेदवार निवडून आला नाही म्हणून हजारो लोकांचे भवितव्य उद्ध्वस्त करणार का, असा सवाल करत जरांगे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट आरोप केला. “बावनकुळे यांच्या सांगण्यावरूनच ही प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी देखील जरांगे यांनी केली. “एका बावनकुळेंना एवढी ताकद देणार असाल, तर आम्ही तुमचे १५ ते २० आमदार पाडू,” असा थेट इशाराही जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.
‘मराठ्यांनी शिंदेंच्या गद्दारीचा डाग पुसला’ (Manoj Jarange Patil)
काही दिवसांपूर्वी मुंबईत उपोषणाला बसलेल्या जरांगे यांचं उपोषण ज्या एकनाथ शिंदे यांनी सोडवलं होत, त्याच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मनोज जरांगे यांनी जोरदार हल्लाबोल केला. मराठ्यांनी शिंदेंच्या गद्दारीचा डाग पुसला, त्याच समाजाविरोधात काम करत असल्याचे जरांगे यांनी म्हटले. तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे होते अशी म्हणायची वेळ आली आहे. तुम्हाला आम्ही जातीवंत मराठा समजायचो, पण तुम्ही आता राजकारणामुळे मराठ्यांच्या लेकरांविरोधात काम करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. मराठा आरक्षणाच्या विरोधात शिंदेंच्या पक्षातील लोक काम करतात, आंदोलने करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. राज्याचे मंत्री संजय शिरसाट आणि खासदार भुमरे हे मराठ्यांच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला.


