नगर : महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना (Ladaki bahin Yojana) सुरु केली. मात्र याच लाडक्या बहिणींच्या हक्काचे पैसे भावांनीच लाटले आहेत. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात (Ahilyanagar) तब्बल ५२३ जणांनी या योजनेचा लाभ (Men took advantage of the situation)घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. ही रक्कम ७४ लाख ७५ हजार रुपये आहे. जिल्ह्यात त्याची वसुली करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील काहीजणांचा अजून पत्ताच लागलेला नाही.
नक्की वाचा :पुणेकरांच्या वाहनावर आता ‘MH 12 ZZ’ कायम राहणार! गडकरींची भेट घेत मुरलीधर मोहोळ यांनी काढला तोडगा
नेमकं प्रकरण काय? (Ladaki bahin Yojana)
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबुत करण्यासाठी राज्याने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. सरकारने २८ जून २०२४ रोजी या योजनेला मान्यता दिली. या योजनेमार्फत राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये लाभ दिला जातो. डीबीटीद्वारे हे पैसे वर्ग केले जातात. मात्र महिला भगिनींच्या नावाखाली चक्क पुरुषांनीच हा लाभ घेतल्याचे सरकारी यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे.
सध्या त्यांची शोधमोहीम सुरू आहे. काही जणांचा पत्ता लागला असून, त्यांच्याकडून वसुलीसाठी सरकारी कर्मचारी हेलपाटे घालीत आहेत. अर्ज करताना जो निवासाचा पत्ता दिला होता, त्या पत्त्यावर संबंधित लाभ घेणारी व्यक्ती नसल्याचे समजते. त्यामुळे वसुलीसाठी अडचण निर्माण झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ही योजना सुरू झाली, त्यावेळी १२ लाख ४१ हजार ८७६ अर्ज आले होते. त्यातून ११ लाख २६ हजार ६५२ अर्ज मंजूर करण्यात आले होते.
फसवणूक नेमकी कशी झाली? (Ladaki bahin Yojana)
लाडकी बहीण योजनेचे अर्ज करताना काहींनी चुकीची माहिती दिली. अर्ज करताना काहींनी पतीचे किंवा मुलाचे आधारकार्ड किंवा बँकेची माहिती दिली. काही महिलांकडून अनावधानाने अथवा अज्ञानामुळे ही कृती झाली असेल, तर काहींनी जाणीवपूर्वक ही माहिती भरली. छाननीदरम्यान त्यांचे हे कृत्य उघडकीस आले आहे. यातील काही महिला अर्जदार असूनही त्याच्या नावापुढे पुरुष लिहिले गेल्याचीही उदाहरणे आहेत.
कुठे किती जण सापडले?
अकोले- ४८, जामखेड – ३८, कर्जत- १८, कोपरगाव ३७, नगर -५२, नेवासे – २२, पारनेर -५१ ,पाथर्डी – २९, राहाता- ४० ,राहुरी – २७, संगमनेर – ६९, शेवगाव -२१ ,श्रीगोंदे -४० श्रीरामपूर – ३१
लाडकी बहीण योजनेचे पात्रता निकष काय? (Ladaki bahin Yojana)
१. महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणे.
२. वय २१ ते ६५ वर्षे दरम्यान असावे.
३. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे.
४. योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार लिंक बँक खाते असावे.
५. कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत, आयकर दाता नसावा.
हे सगळे निकष आहेत आणि याच निकषात बसणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो. मात्र महिलांच्या योजनेत पुरुषांनी सुद्धा हात साफ केलाय. आता ज्या गावातील पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलाय, त्यांचा शोध घेतला जात आहे. त्यांना वसुलीच्या नोटिसा बजावल्या जात आहेत. काहींनी चूक मान्य करून पैसे भरण्याची तयारी दर्शवली आहे. हे पैसे तालुक्याच्या ठिकाणी शासनाच्या नावाने हेड तयार करून त्यात है पैसे भरले जात आहेत. मात्र काहींनी योजनेचा लाभ घेऊन राहत्या ठिकाणाहून स्थलांतर केल्याची माहिती समोर आली आहे.



