
नगर : मराठी रंगभूमीवर ‘गोष्ट तशी गंमतीची’, ‘परफेक्ट मिसमॅच’, ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’, ‘दादा एक गुड न्यूज आहे’ अशी दर्जेदार आणि आशयपूर्ण नाटकांची परंपरा जपणाऱ्या सोनल प्रॉडक्शन्सच्या दोन नाटकांनी (Marathi Play) सध्या नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. ‘जर तर ची गोष्ट’ (jar tar chi gosht) आणि ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’(Amchya Pidhichi Goshtch vegali) या दोन्ही नाटकांना महाराष्ट्रासह देश-परदेशातील रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून दोन्ही नाटकांची यशस्वी घोडदौड कायम आहे.
नक्की वाचा : मोठी बातमी! कर्नाटकात गुटखा,पान मसाला आणि तंबाखूला १ वर्षाची बंदी
विशेष म्हणजे,‘जर तर ची गोष्ट’ चा ४०० वा प्रयोग १६ ॲागस्ट रोजी प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिर येथे सकाळी ११ वाजता तर ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’चा ५० वा प्रयोग ३० ॲागस्ट रोजी विलेपार्ले येथील दिनानाथ नाट्यगृह येथे ४ वाजता रंगणार आहे. त्यामुळे सोनल प्रॉडक्शन्सच्या शिरपेचात आणखी दोन मानाचे तुरे रोवले जाणार आहेत.
अवश्य वाचा : प्रशिक्षकाच्या त्रासाला कंटाळून पारनेरच्या तरुणीने संपवले जीवन; गुन्हा दाखल
नाटकाचे सगळे प्रयोग हाऊसफुल्ल (Marathi Play)

प्रिया बापट प्रस्तुत आणि नंदू कदम निर्मित ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाने आपल्या आगळ्या विषयामुळे आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील दिग्दर्शित, इरावती कर्णिक लिखित या नाटकाचे आतापर्यंतचे प्रयोग हाऊसफुल्ल ठरले असून, मुंबई-पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांत तसेच महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही या नाटकाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता या नाटकाच्या ४०० व्या प्रयोगाची उत्सुकता नाट्यरसिकांमध्ये निर्माण झाली आहे.
नाटकात कलाकार नेमके कोण? (Marathi Play)
दुसरीकडे, प्रिया बापट प्रस्तुत आणि नंदू कदम निर्मित ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी’ या नाटकानेही रंगभूमीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. एका कुटुंबातील तीन वेगवेगळ्या पिढ्यांच्या जगण्यातील, विचारांतील आणि नात्यांतील गंमतीदार प्रवास उलगडणाऱ्या या नाटकाला महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरही रसिकांकडूनही भरभरून दाद मिळत आहे. ३० ऑगस्ट रोजी या नाटकाचा ५० वा प्रयोग रंगणार असून हा टप्पा देखील विशेष ठरणार आहे. सोनल प्रॉडक्शन्स निर्मित या नाटकात सुनील बर्वे, हर्षदा खानविलकर, अक्षर कोठारी, शर्मिला राजाराम शिंदे, शंतनू ठवळी आणि वैष्णवी आंबवणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लेखन अमोल पाटील यांचे असून दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांचे आहे.
विशेष म्हणजे, दोन्ही नाटकांच्या यशामागे त्यांचा नात्यांशी असलेला भावनिक धागा हा महत्त्वाचा घटक आहे. ‘जर तर ची गोष्ट’ मधून तरुणाईच्या नात्यांमधील गुंतागुंत, प्रेम, अपेक्षा आणि बदलत्या भावविश्वाचा वेध घेतला आहे, तर ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी’मध्ये तीन पिढ्यांमधील नात्यांवर, विचारांवर आणि बदलत्या जीवनशैलीवर हलक्या फुलक्या शैलीत भाष्य करण्यात आले आहे. दोन्ही नाटकं हसवत-खेळवत नात्यांचं महत्त्व अधोरेखित करतात. एकाच निर्मिती संस्थेची दोन नाटकं, दोन वेगळ्या पिढ्यांच्या नात्यांचा वेध आणि दोन्ही कलाकृतींना मिळणारं प्रेक्षकांचं सारखंच भरभरून प्रेम, ही सोनल प्रॉडक्शन्सच्या या यशाची खासियत ठरली आहे.


