Theft : पाथर्डी : श्री क्षेत्र मढी येथे आषाढी दिप अमावस्येनिमित्त (Ashadhi Deep Amavasya) झालेल्या गर्दीचा फायदा घेत महिला चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत भाविक महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना आज (ता. १२) घडली. ५ महिलांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी (Theft) झाल्याचे समोर आले असून, याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तर अन्य काही महिलांनी तक्रार देण्यास टाळले. याप्रकरणी नऊ संशयित महिला चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.
अन्य महिलांचेही सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे समोर
वैष्णवी रोशन चौगुले (रा. पारगाव, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार. आज (ता. १२) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्या पती व नातेवाईकांसह मढी येथील कानिफनाथ महाराजांच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या होत्या. यावेळी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसूत्र ओढल्यासारखे जाणवले. त्यांनी गळ्याकडे पाहिले असता मणीमंगळसूत्र गायब असल्याचे लक्षात आले. त्याचवेळी गर्दीतून एक महिला पळून जाताना दिसल्याने भाविकांनी तिला पकडले. यानंतर गर्दीत आरडाओरड सुरू झाली. चौकशी केली असता अन्य महिलांचेही सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे समोर आले. नर्मदा वामन जंजाळ, मीना महादेव खेडकर, पदम दत्तू टेकाळे आणि सोनाली निवृत्ती महाले यांच्यासह अन्य भाविक महिलांच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे समोर आले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
यांना घेतले ताब्यात (Theft)
रुक्मिणी महादेव जाधव, (रा. खडकी देवळा, ता. वडवणी),गजराबाई कोल्हापूर शिंदे, (रा. रेवकी, ता. गेवराई) जि. बीड, शेशुबाई किरण पांड्या पवार उर्फ जाधव, (रा. मंगरुळ, घनसांगवी, ता. घनसांगवी),ताई किरण शिंदे(रा. धोडीतांडा, ता. अंबड),संगिता रतन शिंदे( रा. धोतरजोड आष्टी, ता. परतूर),उषा अंकुश शिंदे, (रा. मंगरुळ, ता. घनसांगवी),ज्योती सुमीन शिंदे(रा. आष्टी, ता. परतूर),नंदिनी अमोल उर्फ महादेव शिंदे( रा. आष्टी, ता. घनसांगवी)जि. जालना,फुलाबाई गणेश पवार( रा. वाळुंज, ता. पंढरपूर) जि. सोलापूर या संशयित नऊ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना
फिर्यादीत स्पष्टपणे नमूद असलेल्या पाच महिलांच्या दागिन्यांचे एकूण वजन ३० ग्रॅम वजनाचे दागिने चोरी गेले आहे. या दागिन्यांची एकूण किंमत लाखो रुपये आहे. यामध्ये वैष्णवी चौगुले यांचे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र, मीना महादेव खेडकर यांचे सहा ग्रॅम, तर नर्मदा वामन जंजाळ, पदम दत्तू टेकाळे आणि सोनाली निवृत्ती महाले यांचे प्रत्येकी चार ग्रॅम वजनाचे दागिने चोरीला गेले आहेत.दरम्यान, अमावस्येनिमित्त मढी येथे राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने नाथ भक्त दाखल झाले होते. दर्शनासाठी मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना घडल्याने भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.
चोरीला बळी पडलेल्या महिलांसह अन्य भाविकांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने पोलीस ठाण्यातही मोठी गर्दी झाली. मढीमध्ये चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्याला रोखण्यास पोलीस अपयशी ठरत आहे.



