
Mega Blood Donation Camp : नगर : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, या माध्यमातून अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्याचे काम होत असते. रक्तदान करणाऱ्यांमध्ये समाजात असलेले गैरसमज या मेगा रक्तदान शिबिरातून (Mega Blood Donation Camp) दूर होण्याचे काम होईल. अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने (Ahilyanagar Mobile Retailers Association) मोबाईलमुळे जसे माणसे जोडण्याचे काम केले, तसे रक्तदानातून माणुसकीचे नाते निर्माण केले. नंदनवन मंगल कार्यालय येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत असून, महिलाही पुढे येऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान करताना दिसत आहेत. ही राज्यातील पहिली घटना असेल. रक्तदात्यांचे व रक्तपेढींचे अभिनंदन करतो की, या माध्यमातून अनेक रुग्णांचे जीव वाचले जातील. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन पाहायला मिळाले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले.
नक्की वाचा : नीट परीक्षा केंद्राने न घेता राज्याने घ्यावी : पालकमंत्री राधाकृष्ण विखे

रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित
अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशन व काका ट्रस्ट यांच्यावतीने मेगा रक्तदान शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर गणेश भोसले, अनिल बोरुडे, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, विनायक देशमुख, स्थायी समितीचे सभापती पहलवान सुभाष लोंढे, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, अविनाश घुले, मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप, नगरसेवक विकी जगताप, गोरख पडोळे, अजित पवार, अमित बुरा, मर्चंट बँकेचे चेअरमन संजय चोपडा, मनपा महिला व बालकल्याण समिती सभापती दिपालीताई बारस्कर, प्राध्यापक माणिक विधाते, नगरसेवक महेश तवले, सुनील त्रिंबके, प्रकाश भाग नगरे, आशिष पोखरणा, मनीष चोपडा, सुरेश बनसोडे, मयूर बांगरे, दत्ता गाडळकर, अजिंक्य बोरकर, विपुल शेट्टी, बाळासाहेब बारस्कर, योगेश ठुबे, डॉक्टर सागर बुरुडे, महेश लोंढे, डॉक्टर आशिष भंडारी, राज देशमुख, नगरसेविका सुजाता पडोळे, सोनाबाई शिंदे, सुनीता हुलसंदर, गीतांजली काळे, शितल ढोणे, अनिता शेटीया, मयुरी जाधव आदींसह रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

संग्राम जगताप म्हणाले की (Mega Blood Donation Camp)
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, मोबाईल रिटेलर्स असोसिएशनची २०१६ साली स्थापना झाली. उद्योग-व्यवसायापुरते मर्यादित न राहता समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासत वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. सण, उत्सव, वाढदिवस निमित्ताने प्रत्येकाने रक्तदान करण्याचा संकल्प केला तर रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही. या माध्यमातून अपघातग्रस्त रुग्ण, प्रसूती व थॅलेसीमिया रुग्णांना त्याचा उपयोग होईल. मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या सभासदांनी गेल्या पाच वर्षांपूर्वी सुरू केलेला रक्तदान शिबिराचा उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरेल, असे ते म्हणाले.

रक्तदानाचा सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद: मुम्मका सुदर्शन
जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन म्हणाले की, मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने रक्तदानाचा सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, हे पुण्याचे काम आहे. रक्तदान शिबिर हे राजकारणाचा विषय नसून ही लोकचळवळ आहे. मोबाईल असोसिएशनने मोबाईलवरती ॲप सुरू करून रक्तदात्यांची माहिती द्यावी. त्यांचे रक्त पूर्ण महाराष्ट्राला उपयोगी पडेल. रक्ताचे महत्त्व किती आहे, हे मला गेल्या तीन महिन्यांपूर्वी कळाले. माझ्या कुटुंबामध्ये अपघात झाला होता. यावेळी महानगरासारख्या सिटीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवला. यासाठी रक्तदान शिबिरे ही काळाची गरज बनली आहे. या माध्यमातून अनेक रुग्णांचे जीव वाचले जातील.

२०२१ मध्ये रक्तदान शिबिराला सुरुवात
अजित जगताप म्हणाले की, मोबाईल रिटेलर्स असोसिएशनची स्थापना २०१६ साली झाली. सामाजिक बांधिलकी जोपासत विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली २०२१ मध्ये रक्तदान शिबिराला सुरुवात केली. यावेळी दीडशे रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. २०२२ सालापासून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन सुरू केले. सर्व मोबाईल व्यावसायिक या दिवशी दुकान बंद ठेवून रक्तदान उपक्रमामध्ये सहभागी होत असत. मागील वर्षी ५२०० रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. यावर्षी साडेसात हजार रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे आणि तो पूर्ण केला जाईल. जिल्हाभर १५ ऑगस्टपासूनच रक्तदानाला सुरुवात झाली आहे.
अहिल्यानगर शहरामध्ये रक्तदान शिबिराची लोकचळवळ उभी राहिली असून, ही चळवळ महाराष्ट्रात घेऊन जाणार असून, त्यासाठी मोबाईलवरती ॲप सुरू केला जाणार आहे. देशामध्ये एक टक्काच लोक रक्तदान करत असतात. अधिक लोकांना या रक्तदानाच्या चळवळीमध्ये सहभागी करून घेण्याचे काम केले जाणार आहे. या माध्यमातून अनेक रुग्णांचे प्राण वाचले जातील, असे ते म्हणाले.
वर्षातून एकदा तरी रक्तदान केले पाहीजे: नरेंद्र फिरोदिया
रक्तदान, रक्ताची उपलब्धता आणि मागणी याची एकत्रित माहिती देणारे मोबाईल अप्लिकेशन आय लव नगरच्या माध्यमातून लवकरच आणण्यात येणार आहे, अशी घोषणा आय लव नगरचे संस्थापक, उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केली. पुढे ते म्हणाले की, स्वत: पासून आधी सुरूवात केली तर लोक आपल्याला फॉलो करतील. अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने पाच वर्षापूर्वी ही रक्तदानाची चळवळ सुरू केली या चळवळीला आय लव नगर, काका ट्रस्ट तसेच रक्तदात्यांची मोठी साथ आहे. वर्षातून एकदा तरी रक्तदान केले पाहीजे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
नऊ रक्तपेढ्यांचा सहभाग
गोरख पडोळे म्हणाले की, या रक्तदान शिबिरामध्ये नऊ रक्तपेढ्यांनी सहभाग घेतला असून, अहिल्यानगर शहरामध्ये सुमारे पाच हजार रक्तपिशव्यांचे संकलन केले जाणार आहे. सर्व क्षेत्रातील विविध मान्यवरांनी येऊन रक्तदान केले आहे. विशेषतः अंध युवकांनीदेखील आपला रक्तदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले. आभार प्रदर्शन अजित पवार यांनी मानले.


