
IPS Vaibhav Gaikwad : नगर : महाराष्ट्रातील धडाडीचे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख असलेल्या IAS तुकाराम मुंडे (IAS Tukaram Munde) यांच्या कार्यशैलीची आजही चर्चा होत असताना. तेलंगणात महाराष्ट्राच्या मातीतून गेलेल्या एका IPS अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षमतेची वेगळी छाप निर्माण केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपळगाव माळवी येथील मूळ रहिवासी असलेले IPS अधिकारी वैभव रघुनाथ गायकवाड (IPS Vaibhav Gaikwad) यांनी तेलंगणा कॅडरमध्ये (Telangana Cadre) विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत गुन्हेगारीविरोधात धडक कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. सध्या ते हैदराबाद शहरात DCP, Task Force म्हणून कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वाखाली संघटित गुन्हेगारी, राऊडीशीटर्स, अवैध धंदे, अमली पदार्थांची तस्करी तसेच अन्नभेसळीविरोधात प्रभावी कारवाया सुरू आहेत.
नक्की वाचा : शिक्षकाच्या कारने ६ विद्यार्थ्यांना चिरडले; श्रीरामपूर तालुक्यातील घटना
हैदराबाद शहरात DCP, Task Force म्हणून कार्यरत
IPS वैभव गायकवाड हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपळगाव माळवी येथील मूळ रहिवासी आहेत. भारतीय पोलीस सेवेत 2018 मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची तेलंगणा कॅडरमध्ये नियुक्ती झाली. तेलंगणामध्ये त्यांच्या सेवेला नालगुंडा जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून सुरुवात झाली. त्यानंतर वरंगळ येथे Assistant Superintendent of Police म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. वरंगळमध्येच Additional DCP Administration तसेच Task Force या महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या. त्यानंतर पेद्दापल्ली आणि नागरकर्नूल या दोन जिल्ह्यांत Superintendent of Police म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. विविध जिल्ह्यांमध्ये काम करताना कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण, तपास आणि प्रतिबंधात्मक पोलिसिंगचा व्यापक अनुभव त्यांना मिळाला. डिसेंबर 2025 पासून ते हैदराबाद शहरात DCP, Task Force म्हणून कार्यरत आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याचे काम (IPS Vaibhav Gaikwad)
हैदराबाद शहरातील Task Force ची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. संघटित गुन्हेगारी, गुंडागर्दी, राऊडीशीटर्स, अवैध धंदे, संवेदनशील व गंभीर गुन्ह्यांचा तपास आणि शोध तसेच मोठ्या प्रमाणातील मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याचे काम या विभागामार्फत केले जाते. याशिवाय गणपती, दुर्गाष्टमी, मिलाद-उन-नबी, मोहरम आणि बोनालूसारख्या मोठ्या धार्मिक व संवेदनशील कार्यक्रमांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे, सुरक्षा बंदोबस्ताचे नियोजन करणे आणि संभाव्य धोके टाळणे,ही महत्त्वाची जबाबदारीही Task Force कडे असते.
H-FAST या स्वतंत्र पथकाची निर्मिती
Task Forceच्या जबाबदारीसोबतच वैभव गायकवाड हे Hyderabad City Narcotics Wing चे प्रभारी आहेत. याचबरोबर मार्च 2026 मध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रात H-FAST- Hyderabad Food Adulteration Surveillance Team हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला. हैदराबादसारख्या मोठ्या शहरात अन्नभेसळ, अन्नसुरक्षेशी संबंधित तक्रारी आणि Food Poisoning च्या घटना सातत्याने समोर येत होत्या. Food Safety विभागाकडे मनुष्यबळ आणि इतर संसाधने मर्यादित असल्याने शहरातील मोठ्या प्रमाणावरील अन्नभेसळीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे आव्हानात्मक होते. ही बाब लक्षात घेऊन Hyderabad City Policeच्या माध्यमातून H-FAST या स्वतंत्र पथकाची निर्मिती करण्यात आली. पोलिसांकडील गुप्त माहिती, क्षेत्रीय माहिती संकलन, तपास आणि अंमलबजावणीची क्षमता Food Safety विभागाच्या तांत्रिक कौशल्यासोबत जोडण्यात आली आहे. Food Safety Officers आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या समन्वयाने संयुक्त छापे, नमुने संकलन, पुरावे गोळा करणे आणि कायदेशीर कारवाई केली जात आहे.
अन्नभेसळीविरोधात intelligence-based कारवाई सुरू
मार्च 2026 पासून H-FASTने अन्नभेसळीविरोधात intelligence-based कारवाई सुरू केली. विविध खाद्यपदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीच्या ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त साहित्य जप्त करण्यात आले. मार्च 2026 पासून आतापर्यंत 208 गुन्हे दाखल करण्यात आले असून 232 प्रकरणे Food Safety Officer कडे सोपविण्यात आली आहेत. या कारवाईदरम्यान तब्बल 2 लाख 92 हजार 298 किलो म्हणजेच सुमारे 292 टन भेसळयुक्त साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये मसाले, तूप, दुग्धजन्य पदार्थ, मांसजन्य पदार्थ, चहा, फळे, बेकरी उत्पादने, Ginger-Garlic Paste यांसह विविध खाद्यपदार्थांचा समावेश आहे. तपासादरम्यान खाद्यपदार्थांमध्ये Fabric Dye Colours, Synthetic Colours, हानिकारक रसायने, Palm Oil, Vanaspati, Starch तसेच इतर अपायकारक पदार्थांचा वापर करून भेसळ केली जात असल्याचे निदर्शनास आले.
आरोग्याचे संरक्षण हा प्रमुख उद्देश
H-FAST चे वैशिष्ट्य म्हणजे केवळ एखाद्या दुकानावर छापा टाकून कारवाई करण्याऐवजी भेसळीचा स्रोत आणि संपूर्ण पुरवठा साखळी शोधण्यावर भर दिला जात आहे. तक्रारी, गुप्त माहिती आणि field intelligence च्या आधारे संशयित व्यवसायांची ओळख केली जाते. त्यानंतर Food Safety Officers आणि GHMC अधिकाऱ्यांच्या सहकार्याने संयुक्त कारवाई केली जाते. नमुने संकलित करणे, पुरावे गोळा करणे, भेसळीचे मूळ ठिकाण शोधणे, पुरवठा साखळीचा मागोवा घेणे आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करणे, अशा पद्धतीने ही मोहीम राबविण्यात येत आहे. अन्नभेसळीविरोधात पोलिस यंत्रणेचा थेट सहभाग घेऊन स्वतंत्र पथकाच्या माध्यमातून काम करण्याचा हा अभिनव प्रयोग असून नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे.
आठ महिन्यांत अमली पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई
हैदराबाद सिटी नार्कोटिक्स विंगने मागील आठ महिन्यांत अमली पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. या कालावधीत 400 पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले असून 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. एका मोठ्या कारवाईत सुमारे 3 कोटी रुपये किमतीचे Hash Oil जप्त करण्यात आले.तसेच एका महत्त्वपूर्ण प्रकरणात झारखंडमधील रांची आणि मुंबई येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली.हे आरोपी Speed Post च्या माध्यमातून जवळपास 22 राज्यांमध्ये गांजाचा पुरवठा करत असल्याचे तपासात समोर आले.
मुंबईत लोकल ट्रेनच्या माध्यमातून घरपोच गांजाची डिलिव्हरी केली जात असल्याचेही तपासातून उघड झाले. या कारवाईत जवळपास 5 कोटी रुपयांचे संपूर्ण ड्रग नेटवर्क उघडकीस आणण्यात आले. अमली पदार्थांच्या व्यवसायात सहभागी असलेल्या तसेच व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या 35 विदेशी नागरिकांना देशातून हद्दपार करण्यात आले आहे. तसेच त्यांना भारतात पुन्हा प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अमली पदार्थांची मागणी कमी करण्यासाठीही विशेष प्रयत्न
नार्कोटिक्स विंगचा दृष्टिकोन केवळ अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यापुरता मर्यादित नाही. अमली पदार्थांची मागणी कमी करण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जात आहेत. तेलंगणा सरकारने सरकारी रुग्णालयांमध्ये De-addiction Centres सुरू केले आहेत. अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना या केंद्रांमध्ये उपचार, व्यसनमुक्ती आणि पुनर्वसनासाठी पाठविले जात आहे. हैदराबाद शहरात अलीकडच्या काळात जवळपास 2 हजार व्यक्तींची Drug Testing करण्यात आली. त्यापैकी सुमारे 800 व्यक्ती Drug Positive आढळल्या. या सर्वांना पुढील De-addiction आणि Rehabilitation प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले. यामध्ये केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले किंवा राऊडीशीटर्सच नव्हे, तर गुंडागर्दीत सहभागी व्यक्ती, Street Crimeमध्ये सहभागी असलेले तसेच सुशिक्षित IT आणि इतर क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व्यक्तींचाही समावेश असल्याचे समोर आले.
अमली पदार्थांविरोधातील लढा केवळ तस्कर आणि पुरवठादारांवर कारवाई करण्यापुरता मर्यादित न ठेवता त्याची मागणी कमी करण्यावरही भर दिला जात आहे. व्यसनाधीन व्यक्तींना उपचार व पुनर्वसनाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. हैदराबाद सिटी पोलिसांकडून Supply आणि Demand या दोन्ही बाजूंवर एकाच वेळी लक्ष केंद्रित केले जात आहे. अमली पदार्थांचा गैरवापर रोखणे, तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवणे आणि समाजाचे भविष्य सुरक्षित करणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
अहिल्यानगरचे नाव उज्ज्वल करत असल्याची भावना
अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपळगाव माळवी येथून भारतीय पोलीस सेवेत दाखल झालेल्या वैभव रघुनाथ गायकवाड यांनी तेलंगणातील विविध आव्हानात्मक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत आपल्या कामाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. Task Force, Narcotics Wing आणि H-FAST सारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमधून त्यांनी गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाईसोबतच गुप्त माहितीच्या आधारे तपास आणि प्रतिबंधात्मक पोलिसिंगवर भर दिला आहे.
अन्नभेसळ करणारे व्यावसायिक, अमली पदार्थांचे तस्कर, संघटित गुन्हेगारीतील आरोपी आणि अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या या कारवाईमुळे हैदराबादमध्ये कायदा मोडणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या मातीतून घडलेला हा अधिकारी तेलंगणात कर्तव्य बजावत असताना आपल्या कार्यक्षमतेने राज्याचे आणि विशेषतः अहिल्यानगरचे नाव उज्ज्वल करत असल्याची भावना व्यक्त होत आहे.


