
Dilip Walse : नगर : कुकडी सिंचन प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये प्रस्तावित असलेल्या डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याच्या कार्यवाहीला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. ८ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय दिलासादायक मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या निर्णयाची माहिती देत, हा शेतकऱ्यांच्या संघर्षातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे.
सुनेत्रा पवारांची साथ (Dilip Walse)
कुकडी सिंचन प्रकल्पाच्या ५७०४.५० कोटी रुपयांच्या प्रस्तावातील डिंभे-माणिकडोह बोगदा रद्द करण्याची मागणी वळसे पाटील यांनी १ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली होती. यावेळी १८ जुलै २०२४ रोजी झालेल्या बैठकीत बोगदा होऊ न देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचीही आठवण करून देण्यात आली. त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रश्नावर ठाम भूमिका मांडण्यात आली. सुनेत्रा पवार यांनीही बोगदा रद्द करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले.
रोहित पवारांविरूद्ध आता नवा भिडू! नगरच्या राजकारणात नवी जुगलबंदी?
विविध मागण्यांसाठी लढा (Dilip Walse)
या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सूचना दिल्या आणि मंत्रिमंडळ बैठकीत बोगद्याच्या कार्यवाहीला स्थगिती देण्याचा निर्णय झाला. मात्र, हा अंतिम विजय नसून शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. घोड, मीना व कुकडी नद्यांवरील ६५ K.T. बंधाऱ्यांसाठी पाणी, कळमजाई, बोरघर, फुलवडे व म्हाळसाकांत उपसा जलसिंचन योजनांचा समावेश, डिंभे डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधी, पाबळ-केंदूर परिसरातील १२ गावांना पाणी आणि माणिकडोह परिसरातील बुडीत बंधाऱ्यांचा समावेश अशा मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू राहणार आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संबंधितांची बैठक होणार असून, त्यातून कुकडी प्रकल्पाची पुढील दिशा निश्चित होणार आहे.


