Ahilyanagar News : २ कोटी कर्जावर तब्बल १८ कोटींचे व्याज;अहिल्यानगरच्या दोन सावकारांना अटक

0
Ahilyanagar News : २ कोटी कर्जावर तब्बल १८ कोटींचे व्याज;अहिल्यानगरच्या दोन सावकारांना अटक

नगर :  ‘सावकारकी किती भयंकर असते’, याचा अंगावर काटा आणणारा प्रकार अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar News) समोर आला आहे. २ कोटी रुपयांच्या कर्जावर तब्बल १८ कोटी रुपयांचे व्याज वसूल करणाऱ्या दोन सावकारांच्या (Two Moneylenders) मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. व्याजाच्या या चक्रव्यूहात अडकवून ठेकेदाराला कंगाल करणाऱ्या या सावकारांचे कारनामे ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण. सविस्तर वाचा 

नक्की वाचा : संगमनेरच्या राधिकाने साकारली गाईच्या शेणापासून ‘इकोफ्रेंडली गणेशमूर्ती’

प्रकरण नेमकं काय? (Ahilyanagar News)

याबाबत अहिल्यानगरमधील आगरकर मळ्यात राहणारे दत्तात्रय जगन्नाथ आगरकर (वय ७७, रा. आगरकरमळा, रेल्वे स्टेशन शेजारी) यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, त्यांनी सुरेश कांकरिया यांच्याकडे २०१६ साली जमीन तारण ठेवून २ कोटींचे कर्ज उचलले. फिर्यादी यांनी २ कोटींच्या कर्जाच्या बदल्यात ३ कोटी ७५ लाख रुपये कांकरिया यांना परत केले होते. मात्र, आरोपी व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांची जमीन त्यांना परत केलीच नाही. जमीन बळकावून आरोपींनी फिर्यादींकडे १८ कोटी ३८ लाख २४ हजार रुपयांच्या व्याजासाठी तगादाच लावला. तसेच त्यांनी फिर्यादी यांना मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून आगरकर यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

अवश्य वाचा : कचऱ्यापासून तयार होणार बायोगॅस; अहिल्यानगर महापालिकेचे वाचणार लाखो रुपये

या फिर्यादीवरून या दोन सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरेश मोतीलाल कांकरिया (वय ६४, रा. विराज कॉलनी, तारकपूर) व विनय गुरुलिंग होनराव (वय ५५, रा. डावरेगल्ली, अहिल्यानगर), असे अटक केलेल्या सावकारांचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या या दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख करत आहेत.

अवैध सावकारी करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल (Ahilyanagar News)

सध्या नगर शहर व जिल्ह्यात अवैध सावकारीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. विविध पोलिस ठाण्यांत या अवैध सावकारी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल आहेत. बेकायदेशीर सावकारांविरोधात तक्रारीही प्राप्त होतात, मात्र उपनिबंधक कार्यालयाने कारवाई करण्याऐवजी याबाबत मौन बाळगल्याच चित्र दिसत आहे.