Ahilyanagar News : अहिल्यानगर महापालिकेचा विकास आराखडा प्रसिद्ध; ९ ऑक्टोबरपर्यंत घेता येणार हरकती

0
Ahilyanagar News : अहिल्यानगर महापालिकेचा विकास आराखडा प्रसिद्ध; ९ ऑक्टोबरपर्यंत घेता येणार हरकती

नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेचा (Ahilyanagar News) मूळ हद्दीचा तिसरा सुधारीत प्रारूप विकास आराखडा (Development Plan)व वाढीव हद्दीचा पहिला सुधारीत प्रारूप विकास आराखडा एकत्रितपणे १० सप्टेंबर रोजी महानगरपालिकेच्या (Ahilyanagar Corporation) मुख्य प्रशासकीय कार्यालयात व संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मनपा आयुक्त यशवंत डांगे (Municipal Commissioner Yashwant Dange) यांनी ही माहिती दिली. या आराखड्यावर नागरिकांना ९ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. यासाठी अहिल्यानगर महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त कार्यालय तसेच टीव्ही सेंटर येथील उपसंचालक नगररचना डीपी युनिट कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत या हरकती व सूचना स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

नक्की वाचा : शेतकऱ्यांसाठी राज्यसरकारचा मोठा निर्णय; थेट शेतात जाऊन करणार सर्व्हेक्षण

नव्या विकास आराखड्यात नेमकं काय? (Ahilyanagar News)

नव्या विकास आराखड्यात शहराच्या भावी वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक व सामाजिक सुविधांसाठी एकूण ४७९ आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली असून, त्यांचे एकत्रित क्षेत्रफळ ४१५.१५ हेक्टर इतके आहे. यामध्ये क्रीडांगणासाठी सर्वाधिक ९० आरक्षणे (१०३.४३ हेक्टर) निश्चित करण्यात आली असून, त्याखालोखाल उद्यान व बगीच्यासाठी ८४ आरक्षणे (६८.४४ हेक्टर) प्रस्तावित आहेत. याशिवाय भाजी मंडई, खरेदी केंद्र व बाजारासाठी ६० आरक्षणे (११.०० हेक्टर), शैक्षणिक सुविधांसाठी ४० आरक्षणे (२६.२२ हेक्टर), तर रुग्णालये व आरोग्यसेवेसाठी २८ आरक्षणे (१०.६४ हेक्टर) देण्यात आली आहेत.

सार्वजनिक वाहनतळासाठी ३२ आरक्षणे, महानगरपालिका प्रयोजनासाठी ३८ आरक्षणे आणि मैला शुद्धीकरण (४ आरक्षणे) व घनकचरा व्यवस्थापनासाठी (१ आरक्षणे) स्वतंत्र जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून पार्किंगसाठी ३२ जागांवर आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

अवश्य वाचा : माधुरी हत्तीणीला कोल्हापूरच्या नांदणी मठात आणण्याच्या प्रयत्नांना पेटाचा धक्का

प्रस्तावित आराखड्यानुसार शहराचे एकूण नियोजन क्षेत्र ६८०९.०७ हेक्टर असून, त्यात विकासयोग्य क्षेत्र ६०८२.१५ हेक्टर (८९.३२%) आणि अविकासनीय क्षेत्र ७२६.९२ हेक्टर (१०.६८%) असे वर्गीकरण करण्यात आले आहे. विकासयोग्य क्षेत्रात निवासी वापरासाठी सर्वाधिक ३९४६.०६ हेक्टर (५७.९५%) जमीन प्रस्तावित असून, याद्वारे वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यास प्राधान्य दिले आहे.

याव्यतिरिक्त वाहतूक व दळणवळणासाठी १२८१.२९ हेक्टर, सार्वजनिक व निमसार्वजनिक वापरासाठी ३२६.५६ हेक्टर, मनोरंजनात्मक वापरासाठी २८९.५० हेक्टर आणि औद्योगिक तसेच व्यापारी वापरासाठी अनुक्रमे ८०.५७ व ५३.१९ हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. अविकासनीय क्षेत्रात प्रामुख्याने कृषी जमीन (४७८.४८ हेक्टर), जलस्रोत (१८४.२६ हेक्टर) आणि वनीकरण (६४.१८ हेक्टर) यांचा समावेश आहे.

शहर विकासाच्या दृष्टीने शाश्वत आराखडा तयार (Ahilyanagar News)

हा सुधारीत विकास आराखडा शाश्वत व वाढीभिमुख शहरी विकासाच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आला असून, त्यात पर्यावरण संवेदनशील क्षेत्रांचे जतन करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. आर्थिक उपक्रमांसाठी व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रांची स्वतंत्र तरतूद केल्याने भविष्यात अहिल्यानगरमध्ये रोजगार निर्मितीला आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच,सार्वजनिक उपयोगिता, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि मनोरंजनाच्या जागांचे योग्य नियोजन करून शहरातील राहणीमानात सुधारणा करणे आणि शहर रचनेची दीर्घकालीन सक्षमता बळकट करण्याचे उद्दिष्ट या आराखड्यातून साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.