Nilesh Lanke | नगर : अहिल्यानगर ( Ahilyanagar ) जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे चालू खरीप हंगामातील पिके संकटात सापडली असून अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप हंगाम अक्षरशः वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून प्रशासनाने तातडीने चारा छावण्या व पाण्याचे टँकर सुरू करावेत, पिकांचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी केली.
नक्की वाचा : अल्पसंख्याकांच्या विकासासाठी शासनाच्यायोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी; प्यारे खान यांचे निर्देश
सर्वेक्षण करून पंचनामे करा ( Nilesh Lanke )
यासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. जिल्ह्यातील पावसाची सद्यस्थिती, पीक परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करावेत, तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी नगरसेवक योगीराज गाडे, सरपंच शरद पवार, माजी सभापती बाळासाहेब हराळ, बाबासाहेब तरटे, शशी गव्हाणे, निलेश मालपाणी, अरुण म्हस्के, महादेव कोकाटे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत ससाणे, गणेश तोडमल, शिवा पाटील होळकर, तालुकाध्यक्ष शेखर पांचमुख, संजू कांबळे, अल्पसंख्यांक अध्यक्ष अथर खान, शहर कार्याध्यक्ष अझहर शेख, महिला शहराध्यक्ष अर्चना गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष योगिता राजळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे आदी उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
दुष्काळसदृश परिस्थिती ( Nilesh Lanke )
खासदार निलेश लंके यांनी निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर जिल्ह्यात चालू खरीप हंगामात अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे अनेक भागांमध्ये गंभीर पाणीटंचाई व दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके मोठ्या संकटात सापडली आहेत.
विशेषतः सोयाबीन, तूर, उडीद, कपाशी तसेच इतर खरीप पिकांच्या उत्पादनावर पावसाच्या कमतरतेचा मोठा विपरीत परिणाम झाला आहे. पिकांच्या निर्णायक वाढीच्या कालावधीत आवश्यक पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून, काही भागात पिके करपण्यास सुरुवात झाली आहे.
शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे, मशागत व इतर शेतीकामांसाठी मोठा खर्च केला आहे. मात्र अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही भरून निघणार नसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. पावसाअभावी पाणीसाठे कमी होत असल्याने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा तसेच पशुधनासाठी पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर चारा उपलब्धतेवरही परिणाम होत असून पशुधनाचे संगोपन करणे शेतकऱ्यांसाठी कठीण होत आहे.
या पार्श्वभूमीवर केवळ पंचनाम्यांची प्रक्रिया करून थांबता कामा नये. परिस्थितीचे तातडीने वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे खासदार लंके यांनी निवेदनात नमूद केले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पावसाची सद्यस्थिती, पीक परिस्थिती व पिकांच्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करण्यात यावेत.
सोयाबीन, तूर, उडीद व इतर खरीप पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार वाढीव व पुरेशी नुकसानभरपाई देण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात यावा. ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे किंवा निर्माण होण्याची शक्यता आहे, त्या गावांमध्ये तातडीने शासकीय पाण्याचे टँकर सुरू करण्यात यावेत.
पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात. पावसाची कमतरता, पिकांची झालेली हानी, उपलब्ध जलसाठे, भूजल पातळी व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती याचा तालुकानिहाय वस्तुनिष्ठ आढावा घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्याबाबत तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा.
दुष्काळसदृश परिस्थितीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई, पिण्याचे पाणी, चारा, वीजबिल व इतर आवश्यक सवलती तसेच मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या संबंधित विभागांशी समन्वय साधावा.
भुईकोट किल्ल्याच्या विकासाचे कोणीही श्रेय घेऊ नये, अशी टीका खासदार निलेश लंके यांनी नाव न घेता केली. ते म्हणाले, मी स्वतः देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे २९ जुलै रोजी भेट घेऊन भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी निवेदन देऊन पाठपुरावा केला. त्यानुसार या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. तसे पत्र संबंधित विभागाने मला दिले होते. कोणीही भुईकोट किल्ल्याच्या विकासाचे श्रेय घेऊ नये. तसेच मनमाड रस्त्याचेही श्रेय घेऊ नये, असे सांगत लंके यांनी नाव न घेता संबंधितांवर टीका केली. “आम्ही आमच्या झेंड्यावरतीच पंढरपूर करतो, दुसऱ्याच्या झेंड्यावर नव्हे,” असे म्हणत त्यांनी पद नसताना अधिकाऱ्यांवर दबाव टाकून बैठका घ्यायच्या आणि त्यानंतर आम्हीच काम केले, असे सांगितले जाते, अशी टीका केली.
डिंबे-माणिकडोह योजना अहिल्यानगर जिल्ह्यासाठी फायद्याची आहे. मात्र या योजनेसंदर्भात सरकारमधील मंत्र्यांमध्येच सुसंवाद नसल्याची टीका खासदार निलेश लंके यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी या योजनेला स्थगिती असल्याचे सांगितले; मात्र संबंधित खात्याच्या मंत्र्यांनाच याबाबत माहिती नाही. “हे राज्याचे दुर्दैव आहे,” अशी टीका खासदार निलेश लंके यांनी केली.



