
Minority Community : नगर : अल्पसंख्याक समाजाच्या (Minority Community) सर्वांगीण प्रगतीसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रभावीपणे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावा. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला विशेष प्राधान्य देऊन मदरसा शिक्षणाचे आधुनिकीकरण, उर्दू शाळांमधील (Urdu schools) शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे तसेच विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान (Pyare Jiya Khan) यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, मनपा आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, आयोगाचे सदस्य हुसेन शेख, अहमद देशमुख, शेख वसीम शेख अजिम, सदस्य सचिव मिनाज मुल्ला यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
अल्पसंख्याक समाजाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या विविध संधींची माहिती मिळावी यासाठी शासनाच्या योजनांची व्यापक जनजागृती करणे आवश्यक असल्याचे खान यांनी सांगितले. मदरसा शिक्षणामध्ये आधुनिक अभ्यासक्रमांचा समावेश करून विद्यार्थ्यांना विविध भाषा तसेच व्यावसायिक शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी पात्र संस्थांनी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असेही त्यांनी निर्देशित केले.
उर्दू माध्यमाच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. अल्पसंख्याक समाजासाठी उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदींचा योग्य व परिणामकारक वापर करून शासनाच्या योजनांचा लाभ गरजू व पात्र लाभार्थ्यांना मिळेल, याची दक्षता घ्यावी, असे खान यांनी नमूद केले.
परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जात आहे. या योजनांची माहिती अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी जनजागृती करावी. ‘सबका साथ, सबका विकास’ या भावनेतून अल्पसंख्याक समाजाशी संबंधित विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कार्यवाही सुरू (Minority Community)
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात अल्पसंख्याक समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती बैठकीत दिली. मदरसा आधुनिकीकरणासाठी पात्र संस्थांकडून प्रस्ताव लवकर प्राप्त करून घेण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. उर्दू शिक्षणाच्या विकासासाठीही आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे. अल्पसंख्याकांची लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये शैक्षणिक सुविधा व संधी वाढविणे, लसीकरण, पूरक पोषण आहार तसेच मदरसा आधुनिकीकरण यांसारखे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा बैठकीत सादर केला. यामध्ये स्वर्ण जयंती शहरी स्वयंरोजगार योजनेसह अन्य योजनांच्या अंमलबजावणीची माहिती देण्यात आली. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते.


