MLA Sangram Jagtap : अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील नागरिकांचे आरोग्य (Citizens’ Health) सदृढ व निरोगी राहणे गरजेचे असून, शहराच्या विकासकामांबरोबरच नागरिकांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. शहरातील रुग्णसंख्या वाढण्यापेक्षा ती कमी करण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाने (Ahilyanagar Municipal Corporation Health Department) विविध उपाययोजना राबवाव्यात. शासनाच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम सर्वांनी मिळून करावे, असे प्रतिपादन एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी केले.
नगरसेवक,अधिकारी व कर्मचारी उपस्थित
अहिल्यानगर महानगरपालिका विधानसभा मतदारसंघातील एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची पहिली सभा आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी महापौर ज्योतीताई गाडे, आयुक्त यशवंत डांगे, उपमहापौर धनंजय जाधव, स्थायी समिती सभापती सुभाष लोंढे, सिव्हिल सर्जन संजय घोगरे, मनपा महिला व बालकल्याण समिती सभापती दिपाली बारस्कर, उपसभापती वर्षा सानप, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, डॉ. सागर बोरुडे, दत्ता गाडळकर, निखिल वारे, सुरेश बनसोडे, प्रकाश भागानगरे, मयूर बांगरे, महेश तवले, बाळासाहेब पवार, पुष्कर कुलकर्णी, मोहित पंजाबी, विजय पठारे, करण कराळे, संजय ढोणे, रोहन सानप, महेश लोंढे, आकाश कातोरे, सुमित लोंढे, सुजय मोहिते, जितू गंभीर तसेच नगरसेविका रोशनी त्रिंबके, सोनाबाई शिंदे, वंदना ताठे आदी सदस्य, डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सागर बोरुडे (MLA Sangram Jagtap)
यावेळी मनपा आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, तर सह अध्यक्षपदी नगरसेवक दत्ता गाडळकर यांची निवड करण्यात आली.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, (MLA Sangram Jagtap)
महापालिकेने सुरू केलेले ‘डेंग्यूमुक्त अहिल्यानगर’ अभियान कौतुकास्पद असून, या माध्यमातून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. याच पद्धतीने स्वच्छता मोहीम आणि आरोग्यविषयक जनजागृती नागरिकांमध्ये करण्यात यावी.
शासनाच्या विविध योजना उपलब्ध असल्या तरी त्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना नसते. देशात विविध कायदे मंजूर होतात; मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती होते, यासाठी लोकसहभागाची खरी गरज आहे. नागरिकांच्या सोयीनुसार आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

महापालिकेच्या मोफत लॅबची वेळ सकाळच्या सत्रात ठेवावी, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल. आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी काम करीत असताना समाजाबद्दलची चांगली भावना, नागरिकांशी सुसंवाद, संपर्क आणि कौटुंबिक स्नेह निर्माण करावा. या माध्यमातून आरोग्याच्या चांगल्या सुविधा नागरिकांपर्यंत सहजपणे पोहोचतील.
समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती आपल्या आरोग्यासाठी चार डॉक्टर उभे करू शकतात; मात्र सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आर्थिक परिस्थितीमुळे आरोग्याच्या सुविधांपासून लांब राहू शकते. त्यामुळे अशा सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे आणि आरोग्य सुविधांचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे, असे आमदार जगताप यांनी सांगितले.
शहरातील महापालिकेच्या आरोग्य केंद्रांच्या बाहेर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांचा फलक दर्शनी भागात लावावा. त्यावर डॉक्टरांचे मोबाईल क्रमांकही नमूद करावेत, जेणेकरून नागरिकांना उपलब्ध सुविधांची माहिती सहज मिळेल. महापालिका आरोग्य विभागाने झोन कार्यालयानुसार समित्या स्थापन करून नगरसेवकांना अध्यक्ष करावे. या समित्यांनी दर आठवड्याला आरोग्यविषयक बैठक घ्यावी. त्यानुसार प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून शहरात महापालिकेच्या जिजामाता हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली आहे. हे हॉस्पिटल खासगी हॉस्पिटलच्या बरोबरीने उभे राहिले आहे. या माध्यमातून नगरकरांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करावे.
पुढील कामासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सर्वांच्या योगदानातून अहिल्यानगर शहरातील आरोग्याच्या सर्व सेवा सक्षम करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे आमदार जगताप यांनी सांगितले.
शहराची उपनगरे झपाट्याने वाढत असून नागरिकांच्या वसाहतीही वाढत आहेत. या भागांमध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी चांगल्या इमारती उभ्या करण्यासाठी महापालिकेने पाठपुरावा करावा. त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांच्या माध्यमातून अन्नातील भेसळीवर कारवाई केली जात आहे. त्याचा परिणाम चांगला झालेला दिसत आहे. अशाच पद्धतीने चुकीचे काम करणाऱ्यांवर अंकुश निर्माण करावा आणि आरोग्य व्यवस्थेत लोकसहभाग वाढवावा. महापालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये जाऊन मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देशही आमदार संग्राम जगताप यांनी दिले.
महापौर ज्योतीताई गाडे म्हणाल्या की, महापालिकेच्या माध्यमातून आरोग्याच्या सुविधा नागरिकांच्या घरापर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जात आहे. शासनाच्या माध्यमातून मोफत देण्यात येत असलेल्या लसीकरणाची माहिती नागरिकांना द्यावी, जेणेकरून लहान मुलांचे लसीकरण वेळेत पूर्ण होईल.
नागरिकांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जातील. एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांपर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचविण्यासाठी काम करू, असे त्यांनी सांगितले.
उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले की, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महापालिकेचा आरोग्य विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. विभागाच्या माध्यमातून नागरिकांना विविध सुविधा देण्याचे काम सुरू आहे. हे काम अधिक सक्षमपणे करण्यासाठी नियोजन करावे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती फलकाद्वारे दर्शनी भागात लावावी, जेणेकरून नागरिकांना उपलब्ध सुविधांची माहिती होईल. महापालिकेच्या आरोग्य विभागाची कामगिरी चांगली असून राज्यामध्ये दुसरा क्रमांक आला आहे. यापुढील काळातही नागरिकांना आरोग्याच्या अधिक सक्षम सेवा देण्यासाठी काम करावे, असे त्यांनी सांगितले.
आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने शासनाने स्थानिक विधानसभा सदस्यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अहिल्यानगर महानगरपालिका विधानसभा मतदारसंघातील एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची पहिली बैठक अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आरोग्य, स्वच्छता, पोषण, पाणी गुणवत्ता व रोगप्रतिबंधक उपाययोजनांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवून आरोग्यसेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी काम केले जाईल.
महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधांची माहिती समितीला देण्यात आली. यावेळी सदस्यांनी विविध सूचना मांडल्या असून, त्यावर आवश्यक उपाययोजना केल्या जातील. नगरकरांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी महापालिका आरोग्य विभाग कटिबद्ध असेल, असे आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले. यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर यांनी प्रास्ताविक केले.



