Nationwide Bank Strike Called Off : बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! 28 ते 30 सप्टेंबरचा तीन दिवसांचा देशव्यापी बँक संप स्थगित

0
Nationwide Bank Strike Called Off : बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! 28 ते 30 सप्टेंबरचा तीन दिवसांचा देशव्यापी बँक संप स्थगित
Nationwide Bank Strike Called Off : बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! 28 ते 30 सप्टेंबरचा तीन दिवसांचा देशव्यापी बँक संप स्थगित

Nationwide Bank Strike Called Off : बँकांचे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी 28 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत पुकारलेला तीन दिवसांचा देशव्यापी संप स्थगित (Nationwide Bank Strike Called Off ) करण्यात आला आहे. संप सुरू होण्याच्या अवघ्या काही तास आधी इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्यात रात्री उशिरा महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा झाल्यानंतर संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, कर्मचारी संघटनांच्या सर्व मागण्यांवर अंतिम तोडगा निघाला आहे की चर्चा पुढेही सुरू राहणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

बँकांच्या कामकाजावर होण्याची होती शक्यता

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने विविध प्रलंबित मागण्यांसाठी 28, 29 आणि 30 सप्टेंबर असे सलग तीन दिवस देशव्यापी संप पुकारला होता. या संपाचा परिणाम सार्वजनिक क्षेत्रातील बँका, जुन्या खासगी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामकाजावर होण्याची शक्यता होती. संप झाल्यास चेक क्लिअरन्स, रोख रक्कम जमा करणे आणि काढणे तसेच शाखांमधून होणाऱ्या इतर अनेक बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी रविवारीदेखील बँकांचे कामकाज सुरू ठेवण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यातील चौथ्या शनिवारमुळे बँका बंद होत्या. त्यानंतर रविवार आणि लगेच तीन दिवसांचा संप झाल्यास सलग अनेक दिवस बँकिंग व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता होती.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

संप स्थगितमुळे ग्राहकांना दिलासा (Nationwide Bank Strike Called Off)

त्यामुळे रविवारी बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता तीन दिवसांचा प्रस्तावित संप स्थगित झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बँक कर्मचारी संघटनांच्या प्रमुख मागण्यांमध्ये आठवड्यातून पाच दिवस काम करण्याची व्यवस्था लागू करण्याची मागणी अग्रस्थानी आहे. संघटनांच्या म्हणण्यानुसार केंद्र आणि राज्य सरकारची अनेक कार्यालये तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, एलआयसी, जीआयसी आणि नाबार्डसारख्या संस्थांमध्ये पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू आहे. शेअर बाजार, चलन बाजार आणि विदेशी चलन बाजारातदेखील आठवड्यात पाच दिवस व्यवहार होतात. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनाही पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्यात यावा, अशी संघटनांची मागणी आहे.

याशिवाय पेन्शनच्या लाभांमध्ये सुधारणा करणे, सर्व पेन्शनधारकांसाठी समान महागाई भत्ता धोरण लागू करणे आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणालीतील (NPS) कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेत परतण्याचा पर्याय उपलब्ध करून देणे यांसारख्या मागण्यांचाही यात समावेश आहे. बँक कर्मचारी संघटनांनी यापूर्वी सरकार आणि व्यवस्थापनाकडून या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप केला होता. दुसरीकडे, वित्त मंत्रालयाने कर्मचारी संघटनांना संपाचा मार्ग स्वीकारू नये आणि चर्चेच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न सोडवावेत, असे आवाहन केले होते. अखेर संपाच्या पूर्वसंध्येला झालेल्या बैठकीनंतर तीन दिवसांचा देशव्यापी बँक संप स्थगित करण्यात आला आहे.

त्यामुळे बँक ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी कर्मचारी संघटनांच्या प्रमुख मागण्यांवर नेमका कोणता निर्णय झाला, पुढील चर्चा कधी होणार आणि संघटनांकडून पुन्हा आंदोलनाची हाक दिली जाणार का, याकडे आता बँक कर्मचारी आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.