नगर : अहिल्यानगरच्या जामखेड (Jamkhed News) तालुक्यातील सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रामधील अंतर्गत वादातून एका ३१ वर्षीय गर्भवती महिलेचा खून (Murder of a Pregnant woman) करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या मृत महिलेला बेदम मारहाण (Woman brutally beaten) करून आधी बेशुद्ध करण्यात आले, त्यानंतर धुळे जिल्ह्यातील गरताड बारी परिसरातील डोंगराळ भागात तिच्यावर पेट्रोल टाकत तिला जिवंत जाळलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या, तर दोघे अजूनही फरार आहेत.
नक्की वाचा : कोपर्डी अत्याचार प्रकरण; उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना घटनास्थळाची पाहणी का करायची?
प्रकरण काय? (Jamkhed News)
काही दिवसांपूर्वी धुळे-सोलापूर महामार्गावरील गरताड बारी भागात एका महिलेचा जळालेला मृतदेह सापडला होता. या मृतदेहाजवळच ज्वलनशील पदार्थ होता. त्यानंतर याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शवविच्छेदन अहवालात मृत महिला गर्भवती असल्याचे आणि तिला जाळून मारल्याचे समोर आले. मात्र, ही घटना कुणीही प्रत्यक्षदर्शी न पाहिल्याने मृत महिलेची ओळख पटवणे कठीण होते. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करत महामार्गावरील तब्बल ११ तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.
अवश्य वाचा : राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना कोणकोणत्या सुविधा मिळणार?
नेमकं काय घडलं? (Jamkhed News)
या तांत्रिक तपासात त्यांना एक संशयास्पद कार सापडली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे ही कार अहिल्यानगरमधील जामखेड मधून आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी थेट जामखेड गाठत संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरु केली. आता पोलिसांनी कारवाई करत सर्फराज उर्फ शफीक अलीम मोमीन, आरीफ उर्फ खुज्या आसीफ शेख, स्वाती उर्फ आरती गणेश कुन्हाडे, लक्ष्मी बालाजी पवार या चार जणांना अटक केली. तर या प्रकरणातील इतर दोन आरोपी फारुख शेख आणि रोहिणी जाधव हे फरार आहेत,पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
मृत पिंकी हनुमंत काटकर आणि कला केंद्रामध्ये काही अंतर्गत वाद झाला होता. या वादातून आरोपींनी आधी तिला बीड जिल्ह्यात बेदम मारहाण करून बेशुद्ध केले. त्यानंतर तिला गाडीत टाकून राजस्थानात घेऊन जाण्याच्या कट होता. पण धुळे परिसरातील गरताड बारीत ते थांबले. तिथेच आरोपींनी तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याची थरारक घटना घडलीय. आता या घटनेत अजून काय काय खुलासे होणार हे पाहावे लागणार आहे.



