ADCC Election : प्रस्थापितांची बिनविरोधकडे वाटचाल? गडाखांनी उघडले खाते; श्रीगोंदा, राहता, पारनेरमध्ये चुरस कायम

0
ADCC Election : प्रस्थापितांची बिनविरोधकडे वाटचाल? गडाखांनी उघडले खाते; श्रीगोंदा, राहता, पारनेरमध्ये चुरस कायम
ADCC Election : प्रस्थापितांची बिनविरोधकडे वाटचाल? गडाखांनी उघडले खाते; श्रीगोंदा, राहता, पारनेरमध्ये चुरस कायम

ADCC Election : नगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे चित्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यानंतर स्पष्ट होऊ लागले आहे. २१ संचालक जागांसाठी तब्बल ३६९ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, शेवटच्या दिवशी अनेक दिग्गज नेत्यांनी अर्ज दाखल करत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे एका बाजूला बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना वेग आला असताना, दुसऱ्या बाजूला श्रीगोंदा, राहाता आणि पारनेरमध्ये चुरशीची शक्यता निर्माण झाली आहे. बिनविरोध निवडीसाठी प्रस्थापित नेत्यांची बैठक झाली होती. मात्र, सर्व इच्छुकांना या प्रक्रियेत स्थान मिळाले का, यावरून काही मतदारसंघांमध्ये स्वतंत्र उमेदवारी दाखल झाल्याचे चित्र आहे.

जिल्हा बँकेच्या बँकेच्या 21 संचालक पदासाठी एकूण ३६३ उमेदवारी अर्ज

प्रस्थापितांची बिनविरोधकडे वाटचाल?

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या रूपाने प्रस्थापितांच्या बिनविरोध विजयाचे पहिले खाते उघडल्याचे चित्र आहे. नेवासा सेवा सोसायटी मतदारसंघातून गडाख यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचवेळी सोसायटी मतदारसंघातून चंद्रशेखर घुले किंवा त्यांच्या पत्नी राजश्री घुले, बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजितसिंह देशमुख, आमदार अक्षय कर्डिले, आमदार विवेक कोल्हे आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह प्रस्थापित नेत्यांच्या पॅनलमधील अनेक उमेदवार बिनविरोधच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. विधान परिषद सभापती राम शिंदे यांची तालावर म्यान झाल्यानंतर पडद्यामागील हालचाली पाहता जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दिशेनेच वाटचाल सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, विविध मतदारसंघांत दाखल झालेले अर्ज, इच्छुकांची संख्या आणि त्यानंतर होणारी अर्ज छाननी व माघारीची प्रक्रिया यामुळे अंतिम चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे प्रस्थापितांची ही बिनविरोधची मोहीम किती जागांवर यशस्वी ठरते,, याकडे आता लक्ष लागले आहे.

आजी-माजी खासदारांचा मार्ग खडतर? (ADCC Election)

राहाता सेवा सोसायटी मतदारसंघातून डॉ. सुजय विखे पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात एकनाथ चंद्रभान घोगरे आणि भास्कर निवृत्ती खर्डे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे बिनविरोधच्या प्रयत्नांमध्ये राहाता मतदारसंघ महत्त्वाचा ठरणार आहे. एकनाथ घोगरे हे काँग्रेसच्या प्रतिभा घोगरे यांचे पती असून, घोगरे कुटुंबाची विखे कुटुंबाविरोधातील राजकीय भूमिका यापूर्वीही चर्चेत राहिली आहे. त्यामुळे या अर्जांकडे केवळ सहकारी संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने नव्हे, तर स्थानिक राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे. पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघात खासदार निलेश लंके, आमदार काशिनाथ दाते, गितांजली शेळके आणि राहुल शिंदे यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पारनेरमध्येही बिनविरोधचा मार्ग सोपा नसल्याचे चित्र आहे. चार उमेदवारांच्या अर्जामुळे पुढील छाननी आणि माघारीच्या टप्प्यात कोणते समीकरण आकार घेते, याकडे लक्ष लागले आहे.

साखर स्वस्त, पण चारा अन् दूध महागणार? लवकर ऊस गाळपाचा फायदा कुणाला?

श्रीगोंद्यात सर्वाधिक लक्ष (ADCC Election)

या निवडणुकीत श्रीगोंदा तालुका सर्वाधिक चर्चेत आला आहे. माजी आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, अर्जना पानसरे, प्रणोती राहुल जगताप, माजी मंत्री बबनराव पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते, अनुराधा कुंडलिकराव जगताप आणि प्रवीणकुमार नाहाटा यांच्यासह अनेक प्रमुख इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी बिगरशेती मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. तसेच स्त्री राखीव मतदारसंघात तब्बल ३० अर्ज दाखल झाल्याने श्रीगोंद्यातील स्पर्धेचे चित्र अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. या अर्जांमध्ये मंजुषा गुंड, अनुराधा नागवडे, अर्जना पानसरे, प्रणोती राहुल जगताप आणि अनुराधा कुंडलिकराव जगताप यांचा समावेश आहे.

आता खरी परीक्षा छाननी आणि माघारीची (ADCC Election)

अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज (ता. ०६) अर्जांची छाननी आणि उद्यापासून (ता. ०७) माघारीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे सध्या दिसणारी बहुतेक उमेदवारी अंतिम राहीलच असे नाही. बिनविरोधच्या प्रयत्नांना यश येते की विविध मतदारसंघांतील उमेदवार माघार न घेता निवडणुकीत कायम राहतात, हे पुढील टप्प्यात स्पष्ट होणार आहे. माघारीची अंतिम मुदत २२ ऑक्टोबर आहे. त्यामुळे एकीकडे गडाखांसारख्या काही नेत्यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा होत असताना, दुसरीकडे श्रीगोंदा, राहाता आणि पारनेरमधील उमेदवारीमुळे सामंजस्याच्या फॉर्म्युल्याची खरी परीक्षा सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक प्रत्यक्षात किती जागांवर होणार, याचे उत्तर आता माघारीच्या टप्प्यातच मिळणार आहे.