नगर : दिल्लीमध्ये आज सीजेपीकडून जंतरमंतर २.० ची घोषणा करण्यात आल्यानंतर अभूतपूर्व बंदोबस्त करण्यात आला आहे. सकाळपासूनच अनेकांची धरपकड सुरू असून दिल्ली पोलिसांकडून मारहाण झाल्याचा सुद्धा आरोप होत आहे. त्यातच आज कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके(Abhijeet Dipke), सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी विमानातच ताब्यात (Arrested) घेतलं. या तिन्ही नेत्यांनी जंतरमंतरवर आंदोलनाला जाऊ नये म्हणून पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे तिघेच नव्हे तर प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र ही आणीबाणी असून हुकुमशाही असल्याचं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा : नाना पाटेकर यांचा रात्री २:३० वाजता मित्राला मेसेज ; डॉक्टरांनी सांगितलं शेवटच्या तासांत काय घडलं?
विमानात नेमकं काय घडलं? (Abhijeet Dipke)

दिल्ली विमानतळावर विमान लँड होताच पोलिस थेट विमानात घुसले. त्यांनी आधी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर दीपकेंच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. अभिजीत आपल्या जागेवरून उठले. तेव्हा महिला पोलिसांनी त्यांना पकडून तुम्हाला ताब्यात घेण्यात येत असल्याचं सांगितलं. त्यावर दीपके यांनी खिशातून मोबाईल काढून कुणाला तरी मेसेज केला. त्यानंतर, अरे मला माझी बॅग तर घेऊ द्या. मी अटक व्हायलाच आलो आहे. मला करा अटक. तुम्हाला मी घाबरलो नाही, असं सांगत पोलिसांना हात जोडले. मला माझी बॅग घेऊ द्या, असं ते कळवळून पोलिसांना सांगत होते. पण पोलीस ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे दीपके आणि त्यांचे सहकारी पोलिसांवर भडकले. पोलिसांनीही मुजोरी आणि अरेरावी सुरूच ठेवल्याने विमानातच वादावादी झाली. त्यामुळे हायव्होल्टेज ड्रामा रंगला.
अवश्य वाचा : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सौंदाळा ग्रामसभेचा ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
ध्रुव राठीला का ताब्यात घेतलं? (Abhijeet Dipke)
दुसरीकडे,आंदोलनासाठी दिल्लीमध्ये पोहोचलेल्या युट्युबर ध्रुव राठीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गुरुग्राम मधील घरामध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलं. साध्या वेशामध्ये पोलिसांचा फौजफाटा ध्रुव राठीच्या घरात घुसला आणि त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर सीजेपीच्या लीगल टीमच्या हेड रत्ना सिंह यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलंय. गुरूवारी बंगळुरू येथे SIR विरोधात झालेल्या आंदोलनात ध्रुव राठी सहभागी झाला होता. तर दिल्ली येथील आजच्या जंतर मंतर येथील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करणारी पोस्टही त्याने सोशल मीडियावर शेअर केली होती.त्यामुळे ही कारवाई झाली.
पोलिसांनी अभिजीत दीपकेंना ताब्यात घेण्यासाठी आधीच प्लॅन केला होता. पोलिसांना दाखवण्यासाठी विमानतळाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे दीपके विमानतळाच्या बाहेर आल्यावर त्यांना ताब्यात घेतलं जाईल असा कयास होता. पण काही पोलीस विमानतळावर साध्या वेशात गेले होते. दीपके यांचं विमान येताच पोलीस विमानात घुसले. विमानातील प्रवाशांना विमानातून न उतरण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे प्रवाशी जागेवरच बसून होते. त्यानंतर त्यांनी दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी हा प्रीप्लानच केला होता. दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.



