
पुणे-अहिल्यानगर लोकल, नवीन रेल्वे मार्ग, बंद पॅसेंजर सेवा आणि प्रवासी सुविधांचे प्रश्न रेल्वे स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित
Pune-Ahilyanagar Local Train : अहिल्यानगर :अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे विकासाला गती मिळावी, प्रवाशांच्या सुरक्षिततेसह मूलभूत सुविधांचा विस्तार व्हावा आणि रखडलेल्या प्रकल्पांना निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी खासदार नीलेश लंके (MP Nilesh Lanke) यांनी रेल्वे स्थायी समितीच्या बैठकीत केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न, नवीन रेल्वे सेवा, उड्डाणपूल व भुयारी मार्ग, शेतमाल वाहतुकीसाठी कार्गो टर्मिनल आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी अशा विविध विषयांकडे त्यांनी समितीचे लक्ष वेधले.
मागण्यांवर प्रत्यक्ष अंमलबजावणी आवश्यक
रेल्वे प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्येक प्रकल्पाची सद्यस्थिती, कामाची प्रगती आणि पूर्णत्वाची निश्चित तारीख जाहीर करावी, अशी भूमिका खासदार लंके यांनी मांडली. जिल्ह्यातील रेल्वे विकासाच्या मागण्या कागदोपत्री न राहता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सुरक्षित रेल्वे प्रवासाची आवश्यता (Pune-Ahilyanagar Local Train)
अहिल्यानगर तसेच दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘कवच’ स्वयंचलित रेल्वे सुरक्षा प्रणाली, ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन, आरएफआयडी टॅग, ऑप्टिकल फायबर केबल, ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी त्यांनी केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित करण्याची आवश्यकता त्यांनी मांडली.

अहिल्यानगर रेल्वे स्थानक परिसरातील उपलब्ध रेल्वे जमिनीचा वापर करून गती शक्ती कार्गो टर्मिनल, शेतमाल लॉजिस्टिक हब आणि कंटेनर डेपो उभारण्याचा मुद्दाही खासदार लंके यांनी उपस्थित केला. कांदा, दूध, भाजीपाला आणि अन्य कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी या सुविधा उपयुक्त ठरू शकतात. त्यातून शेतकऱ्यांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होण्यासह स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. रेल्वे परिसरात किऑस्क आणि रिक्षा स्टँडसाठी जागा उपलब्ध करून स्थानिक तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी देण्याची मागणीही त्यांनी केली.
अहिल्यानगर-पुणे,(Pune-Ahilyanagar Local Train) छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर आणि कल्याण-मुरबाड या प्रस्तावित रेल्वे मार्गांच्या सविस्तर प्रकल्प अहवालासाठी (डीपीआर) निश्चित कालमर्यादा जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. रेल्वे विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) आणि इरकॉन यांच्या कामांचे मूल्यमापन करावे, तसेच अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर अमृत भारत योजनेंतर्गत झालेल्या कामांच्या दर्जाची चौकशी करावी, असे मुद्देही त्यांनी मांडले. अहिल्यानगर एमआयडीसीतील स्थानिक लघुउद्योजकांना रेल्वेच्या पुरवठा साखळीत संधी मिळावी, यासाठीही पाठपुरावा करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
निंबळक येथील रेल्वे गेट क्रमांक ३०, विळद, वांबोरी, अरणगाव आणि श्रीगोंदा साखर कारखाना परिसरातील रेल्वे उड्डाणपूल व भुयारी मार्गांची कामे मार्गी लावण्याची मागणी खासदार लंके यांनी केली. या प्रकल्पांची सद्यस्थिती स्पष्ट करून काम सुरू होण्याची आणि पूर्ण होण्याची तारीख निश्चित करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पुणे-अहिल्यानगरदरम्यान डेमू किंवा ईएमयू लोकल सेवा सुरू करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करावा, तसेच अहिल्यानगरहून जयपूर आणि खाटू श्यामसाठी रेल्वे सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. पुणे-लखनऊ, पुणे-गोरखपूर, यशवंतपूर-चंदीगड आणि संपर्क क्रांती यांसारख्या गाड्यांना अहिल्यानगर स्थानकावर थांबा देण्याचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. बेलवंडी व विसापूर स्थानकांवर महत्त्वाच्या गाड्यांना थांबे देण्यासह कोरोना काळात बंद झालेल्या नांदेड-दौंड, मनमाड-पुणे आणि शिर्डी-मुंबई पॅसेंजर सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.
अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीनसाठी केडगाव बाजूने स्वतंत्र स्टेशन इमारत आणि प्रवेशद्वार उभारावे, अशी मागणीही खासदार लंके यांनी केली. स्थानकावर लिफ्ट, एस्कलेटर, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रतीक्षागृहे उपलब्ध करून देण्यासह ड्रेनेजची समस्या, दुर्गंधी, मोकाट कुत्रे आणि रणगाडा परिसरातील अस्वच्छता दूर करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी नमूद केले. आरक्षण व चौकशी खिडकीच्या वेळा पूर्ववत सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत करण्याची मागणीही करण्यात आली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे संपर्काचा विस्तार, प्रवाशांची सुरक्षितता, शेतमाल वाहतूक आणि स्थानिक रोजगार या बाबींना प्राधान्य देऊन रेल्वे प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी, यासाठी संसदीय समितीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी स्पष्ट केले.


