Jamkhed Crime : जामखेडमध्ये युवकावर कोयत्याने हल्ला, मनगटापासून तुटला हात; कारण काय?

0
Jamkhed Crime : जामखेडमध्ये युवकावर कोयत्याने हल्ला, मनगटापासून तुटला हात; कारण काय?

नगर : जामखेड – नगर (Jamkhed Crime) रस्त्यावरील एका चहाच्या दुकानात बसलेल्या राहुल अंधारे (वय- ३४) (Rahul Andhare) या युवकावर तीन अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने अचानक जीवघेणा हल्ला (Deadly attack) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात राहुल अंधारे यांचा एक हात मनगटापासून पूर्णपणे वेगळा झाला असून, या थरारक घटनेमुळे जामखेड शहरात मोठी दहशत पसरली आहे. ही घटना बुधवारी (ता.१४) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.

नक्की वाचा : श्रीगोंदा व राहुरी फॅक्टरीत २५ ते ३० जणांना भगर खाल्ल्याने विषबाधा; कारण काय?

नेमकी घटना कशी घडली? (Jamkhed Crime)

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल अंधारे हे नेहमीप्रमाणे जामखेड-नगर रस्त्यावरील एका चहाच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी व मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी आले होते. बुधवारी (ता.१४) सायंकाळी साडेसात वाजता ते हॉटेलमध्ये बसलेले असताना, अचानक दोन हल्लेखोर हातात घातक शस्त्रे घेऊन तिथे घुसले, तर तिसरा तरुण बाहेर मोटारसायकलवर उभा होता. हॉटेलमध्ये शिरलेल्या दोघांनी थेट राहुल अंधारे यांच्यावर वार केला. हा वार चुकवण्याचा प्रयत्न करत असताना अंधारे यांनी आपला हात पुढे केला, त्याचवेळी हल्लेखोराने केलेल्या भीषण वाराने त्यांचा एक हात मनगटाच्या वरच्या बाजूने तुटून बाजूला पडला. या भयानक प्रकारामुळे परिसरात रक्ताचा सडा पडला आणि एकच पळापळ उडाली.

अवश्य वाचा : श्रीरामपूर हादरले;‘जादुई दिव्या’ चा फंडा दाखवून व्यावसायिकाची सव्वा कोटीची फसवणूक

यानंतर तिन्ही हल्लेखोर मोटारसायकलवरून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाले. या थरारक घटनेनंतर उपस्थित असलेल्या काही धाडसी नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या राहुल अंधारे यांना, तसेच त्यांचा तुटलेला हात एका कागदी पिशवीत गोळा करून तातडीने जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ अहिल्यानगरमधील रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबतची सविस्तर माहिती अजून समोर आलेली नाही.

कलाकेंद्रातील वादाची किनार? (Jamkhed Crime)

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या घटनास्थळाचा पंचनामा केला असून हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे आणि त्यांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.

राहुल अंधारे यांच्याशी संबंधित एका कलाकेंद्रातील वादानुसार, सुमारे महिनाभरापूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, दोन दिवसांपूर्वीच कलाकेंद्रावरून काहीसा वाद झाल्याची चर्चाही परिसरात सुरू आहे. याच जुन्या किंवा ताज्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा पूर्वनियोजित हल्ला झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या हल्ल्याचे नेमके कारण पोलीस तपासातच स्पष्ट होणार असून पोलीस त्या दिशेने कसून तपास करत आहेत. मात्र भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे पोलीस आरोपींना कधी जेरबंद करतात आणि या हल्ल्यामागे नेमकं काय कारण समोर येतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.