
Shrimad Bhagwat Stories : नगर : सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाणारा, कार्यकर्त्यांना बळ देणारा आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असलेला लोकनेता काळाच्या पडद्याआड गेला, मात्र त्याच्या आठवणी आजही जनमानसात जिवंत आहेत. भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते, माजी आमदार स्व. शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बुर्हाणनगर येथे आयोजित तीन दिवसीय श्रीमद्भागवत कथेची (Shrimad Bhagwat Stories) बुधवारी (ता. २१) भक्तिमय वातावरणात सांगता झाली. जगप्रसिद्ध प्रवचनकार जया किशोरी यांच्या अमृतवाणीतून भाविकांनी भक्तिरसाचा अनुभव घेतल्यानंतर पंढरपूरचे ह.भ.प. जयवंत महाराज बोधले यांच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील आठवणींना उजाळा देण्यात आला. सर्वसामान्य माणसाशी थेट नाळ जोडणारे नेतृत्व, कार्यकर्त्यांशी जपलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरण्याची त्यांची वृत्ती यांचा आवर्जून उल्लेख करण्यात आला.
नक्की वाचा : दुष्काळामुळे सत्कार स्वीकारणार नाही, सत्काराऐवजी गरजूंना मदत करा; बिपीन कोल्हे यांचे आवाहन

कर्डिले यांचे कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे
स्व. शिवाजीराव कर्डिले यांना अभिवादन करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. स्व. कर्डिले यांनी राजकीय आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून राहुरी विधानसभा मतदारसंघातील जनसामान्यांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी तत्परतेने उभे राहणे, कार्यकर्त्यांशी स्नेह जपणे आणि लोकहितासाठी सातत्याने काम करणे ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. त्यांचे कार्य आणि विचार राहुरी मतदारसंघातील अनेक पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहतील, अशी भावना विखे पाटील यांनी व्यक्त केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अक्षय कर्डिले यांच्या पुढाकाराचे कौतुक (Shrimad Bhagwat Stories)
वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आमदार अक्षय कर्डिले यांनी आयोजित केलेल्या या तीन दिवसीय भागवत कथा सोहळ्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. जया किशोरी यांच्या प्रवचनाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले, तर जयवंत महाराज बोधले यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. वडिलांच्या विचारांचा वारसा जपत त्यांच्या स्मृतींना आध्यात्मिक उपक्रमातून उजाळा देण्याचा अक्षय कर्डिले यांचा प्रयत्न उपस्थितांसाठी भावनिक ठरला. स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आमदार अक्षय कर्डिले यांचे मान्यवरांनी कौतुक केले. जनतेच्या मनात घर करणाऱ्या लोकनेत्याच्या आठवणींना उजाळा देणारा हा सोहळा भक्ती, श्रद्धा आणि कृतज्ञतेचा संगम ठरला.@Akash shinde


