
Government Warehouse : पारनेर : पारनेर येथील शासकीय गोदामातील (Government Warehouse) धान्य खराब व निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीची तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालयाच्या (Taluka Magistrate’s Office) पुरवठा शाखेने दखल घेतली आहे. या धान्यसाठ्याची तपासणी संबंधित सक्षम अधिकारी किंवा अधिकृत तपासणी पथकामार्फत नियमानुसार करण्यात येणार असल्याचे तहसील कार्यालयाने (Tehsil Office) स्पष्ट केले आहे. मात्र, खासगी व्यक्तींना स्वतंत्रपणे गोदाम उघडून धान्याची प्रत्यक्ष तपासणी करण्यास परवानगी देता येणार नसल्याचेही प्रशासनाने आपल्या उत्तरात नमूद केले आहे.
नक्की वाचा : उच्च न्यायालयाने एकनाथ घोगरे यांची याचिका फेटाळली; डॉ. सुजय विखे पाटील यांचा जिल्हा बँकेतील मार्ग मोकळा
धान्यसाठ्याची नियमानुसार तपासणी करण्याची कार्यवाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुकाध्यक्ष अविनाश मुरलीधर पवार यांनी शासकीय गोदामातील धान्याची पाहणी व तपासणी करण्याबाबत तहसीलदार कार्यालयाकडे निवेदन सादर केले होते. गोदामातील धान्य खराब किंवा निकृष्ट असल्याचा मुद्दा त्यांनी या निवेदनातून उपस्थित केला होता. या तक्रारीला उत्तर देताना तहसील कार्यालयाने संबंधित धान्यसाठ्याची नियमानुसार तपासणी करण्याची कार्यवाही केली जाईल, असे कळविले आहे.तहसील कार्यालयाने दिलेल्या उत्तरानुसार, शासकीय गोदामातील धान्यसाठ्याची प्रत्यक्ष तपासणी अधिकृत अधिकारी किंवा तपासणी पथकामार्फत केली जाईल. आवश्यकतेनुसार धान्याचे नमुने घेऊन त्यांची गुणवत्ता सक्षम किंवा मान्यताप्राप्त प्रयोगशाळेमार्फत तपासण्यात येईल. त्यामुळे धान्याच्या गुणवत्तेबाबत वस्तुनिष्ठ निष्कर्ष मिळण्यास मदत होणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
नमुने घेण्याची प्रक्रिया ही अधिकृत यंत्रणेमार्फतच (Government Warehouse)
दरम्यान, शासकीय गोदामातील साठ्याची तपासणी, धान्याची हाताळणी आणि नमुने घेण्याची प्रक्रिया ही अधिकृत यंत्रणेमार्फतच केली जाते. त्यामुळे खासगी व्यक्तींना स्वतंत्रपणे गोदाम उघडून धान्याची तपासणी करण्याची परवानगी देणे शक्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध निष्कर्ष आणि नियमानुसार देता येणाऱ्या माहितीसंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही तहसील कार्यालयाने नमूद केले आहे. आता या तपासणीत शासकीय गोदामातील धान्याच्या गुणवत्तेबाबत नेमके काय निष्पन्न होते आणि संबंधित प्रशासन पुढे कोणती कार्यवाही करते, याकडे पारनेरमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


