
Daytime house burglary by three thieves : पारनेर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील खिलारी वस्तीवर दिवसाढवळ्या घरफोडी (Daytime house burglary by three thieves) करून तीन लाख नऊ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून ही चोरी केली. याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात (Parner Police Station) तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगल गोरडे यांनी दिली फिर्याद
याबाबत मंगल संतोष गोरडे (वय ४५, रा. खिलारी वस्ती, टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. गोरडे या रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आई चंद्रभागा यांच्यासोबत घरासमोरील महामार्गाच्या पलीकडे असलेल्या शेतात कांद्याच्या पिकाची खुरपणी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचे पती मजुरीच्या कामासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांनी घराचे दोन्ही दरवाजे बंद करून कुलूप लावले होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मोटारसायकलवरील तिघांकडून चाेरी (Daytime house burglary by three thieves)
दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास शेतातून घराकडे पाहिले असता, घराजवळ २० ते २५ वर्षे वयोगटातील तीन तरुण दिसले. गोरडे यांनी तत्काळ घराकडे धाव घेत तरुणांना थांबण्यास सांगितले. मात्र, त्यांनी मोटारसायकलवरून तेथून पळ काढला. त्यानंतर घराजवळ जाऊन पाहणी केली असता, पश्चिम बाजूच्या खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. तसेच घरातील कपाट आणि इतर सामानाची उचकापाचक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घरातील सोन्याचे मणी, मंगळसूत्र, सोन्याची बोरमाळ, नेकलेस, दोन तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, कानातील सोन्याची वेल, सोन्याचे डोरले, १४ सोन्याचे शिपले आदी दागिने चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चोरीस गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत तीन लाख नऊ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या घटनेमुळे टाकळी ढोकेश्वर परिसरात खळबळ उडाली असून, दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार एस. व्ही. गायकवाड आणि पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र साठे करीत आहेत.


