Diwali | नगर: जीवन प्रकाशमय करणारा दिवाळीचा (Diwali) सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. सुख समृद्धीच्या या मोठ्या सणाचा गोडवा समाजातील दुर्लक्षित, वंचित, गरीब कुटुंबातील मुला मुलींनाही अनुभवता यावा यासाठी जय आनंद महावीर युवक मंडळाने लाडू आणि चिवडा फराळ पाकिटांचे वाटप केले.
नक्की वाचा : दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे; विखे पाटील यांची ग्वाही
अभिनव उपक्रम (Diwali)
बसस्थानक, रेल्वे स्टेशन, रस्त्यांच्या कडेला वास्तव्य असलेल्या लहान मुलांना दिवाळी फराळाचा खाऊ वितरित केला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला मिळालेली ही आपुलकीची अनपेक्षित गोड भेट मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी ठरली. मंडळाच्या सदस्यांना सहकारी पतसंस्था, बँकांकडून मिळणाऱ्या लाभांशाच्या रकमेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येतो.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मुलांनाही ही भेट (Diwali)
यावेळी अध्यक्ष शैलेश मुनोत, कार्याध्यक्ष सत्येन मुथा, अमित गांधी, राहुल सावदेकर, मनोज चौहान, प्रमोद गांधी (पीटू) आदी उपस्थित होते. मंडळाच्या सदस्यांनी बेघर, रस्त्यावर वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांतील लहान मुलांना फराळाची पाकिटे दिली . शहरातील बाजारपेठेत रस्त्यावर बसून पणत्या, सजावट साहित्य विक्री करणाऱ्या मुलांनाही ही भेट देण्यात आली. दिवाळीत आपल्या जीवनात, मनातही आशेचा, आनंदाचा दीप प्रज्वलित करण्यासाठी कोणी तरी आहे, ही भावना मुलांना ऊर्जा देणारी ठरली.

शैलेश मुनोत म्हणाले, दिवाळी हा सण अंधकार दूर करून आयुष्य प्रकाशमय करण्याचा संदेश देतो. संपन्न व्यक्ती आपल्या कुटुंबासमवेत मोठ्या झगमगाटात हा सण साजरा करतो. पण परिस्थितीने मजबूर असलेल्यांच्या जीवनातही आशेचा दिवा प्रज्वलित झाला पाहिजे. त्याच्याही मुखात गोड घास गेला पाहिजे. ही शिकवण भारतीय संस्कृती देते. आपल्या आसपास असे खूप वंचित असतात. त्यांनाही दीपोत्सवाचा आनंद मिळावा अशी अपेक्षा असते. ‘दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा’ या उक्तीची प्रचिती वंचित, आर्थिक दुर्बल घटकांनाही यावी यासाठी मंडळाने दिवाळी फराळ भेटीचा उपक्रम राबवला. यातून आमच्याही दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला. दरवर्षी मंडळातर्फे विविध बालसंगोपन सामाजिक संस्थांना दिवाळी फराळ दिला जातो. यावर्षी मंडळाने जाणीवपूर्वक वंचितांच्या दारात जाऊन त्यांना गोड भेट दिली.
सत्येन मुथा म्हणाले की, मंडळाचे सदस्य विविध सहकारी पतसंस्था, सहकारी बँकांचे सभासद आहेत. दरवर्षी सभासद म्हणून मिळणारा डिव्हिडंड (लाभांश) एकत्र करून सर्व सदस्य दिवाळी फराळ वाटपाचा उपक्रम राबवतात. स्वतः सणाचा आनंद घेताना गरजूंनाही हा आनंद मिळवून देण्याचा हा प्रयत्न असतो. यावर्षीही शहरातील विविध भागात जाऊन मंडळाच्या सदस्यांनी लहान मुलांच्या चेहरे खुलवणारी दिवाळी साजरी केली. आपल्या मुलांना प्रेमाचा, मायेचा गोड फराळ मिळाल्याने पालकांच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळले. मुलांचे खुललेले चेहरे आमच्या सर्व सदस्यांसाठीही दिवाळीचे सर्वात मोठे रिटर्न गिफ्ट ठरले.



