Accident News : मध्य प्रदेश – महाराष्ट्र सीमेवरील नागपूरजवळच्या पेंच अभयारण्य (Pench Sanctuary) परिसरात झालेल्या भीषण अपघातात (Accident News) एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. विशेष बाब म्हणजे ज्या वाहनामुळे हा अपघात झाला ते अपघातग्रस्त वाहन भाजप आमदार परिणय फुके (MLA Parinay Fuke) यांच्या मालकीचे आहे. या अपघातावेळी त्यांचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी केला आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय? (Accident News)
हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत या अपघाताचे फोटो आणि कारची सर्व माहिती शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय की, एका तरुणाचा जीव गेला आहे, त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा किंवा राजकीय दबावातून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न अजिबात खपवून घेतला जाणार नाही. आमदाराचा मुलगा म्हणून कायद्यापासून संरक्षण मिळणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून द्यावे. निष्पक्ष चौकशी आणि कठोर कारवाई झालीच पाहिजे.
कुणाचा जीव गेला तरी यांना कुठे फरक पडतो? (Accident News)
शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील यासंबंधीची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे, त्यांनी म्हटलंय की, एकीकडे महाराष्ट्रातला शेतकरी दुष्काळात होरपळून जात आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रातल्या आमदारांची पोरं मात्र भरधाव वेगाने गाड्या फिरवत आहेत, कुणाचा जीव गेला तरी यांना कुठे फरक पडतो? चार दिवसांपूर्वी पेंच अभयारण्य मध्य प्रदेशकडून नागपूरला येताना या गाडीचा अपघात झाला.
भरधाव वेगाने पाच मुले आणि पाच मुली दारूच्या नशेत गाडी चालवत असताना हा अपघात झाला. दिशांत अली या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जणांची प्रकृती अति गंभीर आहे. मध्य प्रदेशच्या सिवनी जिल्ह्यातील कुरई पोलीस स्टेशन येथे एम एल सी नोंद झाली. भारतीय जनता पार्टीचे आमदार परिणय फुके यांचा मुलगा ही गाडी चालवत होता. ज्या गाडीने हा अपघात झाला ती गाडी सुद्धा फुके यांच्याच नावावर आहे, अशी पोस्ट सुषमा अंधारेंनी लिहिली आहे.



