AMC | पाण्याचा अपव्यय करणाऱ्या १६ जणांना महापालिकेचा दंड; सात व्यावसायिकांचाही समावेश

0

AMC | नगर : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरात पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी अहिल्यानगर महापालिकेने ( AMC ) १० टक्के पाणी कपातीची अंमलबजावणी सुरू केली आहे. उपलब्ध पाणीसाठा जपून वापरण्याचे आवाहन करतानाच पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरोधात महापालिकेने आता दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. नागरिकांना वारंवार सूचना देऊनही पाण्याची नासाडी सुरूच असल्याने गेल्या आठ दिवसांत तब्बल १६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येकाला एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, यामध्ये सात व्यावसायिकांचाही समावेश असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

हे वाचा – पालकांनी मुलांना मैदानाकडे वळवून पुढची पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करावेत : आमदार संग्राम जगताप

दैनंदिन पाणी वापरात दहा टक्के कपात ( AMC )

दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने दैनंदिन पाणी वापरात दहा टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना पाण्याची गळती आणि नासाडी रोखण्यावरही प्रशासनाने भर दिला आहे. घरगुती वापरासह व्यावसायिक ठिकाणीही पाण्याचा अपव्यय होऊ नये, यासाठी नागरिकांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करून पाण्याचा बेसुमार वापर करणाऱ्यांवर महापालिकेच्या पथकांकडून थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सात व्यावसायिकांचा समावेश ( AMC )

शहरात पाण्याची नासाडी कुठे होत आहे, नळांना तोट्या नसल्याने पाणी वाहून जात आहे का, तसेच सार्वजनिक ठिकाणी पाण्याची गळती होत आहे का, याची तपासणी करण्यासाठी महापालिकेने विशेष पथके नियुक्त केली आहेत. ही पथके विविध भागांत पाहणी करून पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. गेल्या आठ दिवसांत १६ जणांवर प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यामध्ये दुकानदार, बेकरी, हॉटेल व्यावसायिकांसह अन्य सात व्यावसायिकांचा समावेश आहे.

पाणी बचतीबाबत जनजागृती ( AMC )

 पाणी कपातीची अंमलबजावणी करताना केवळ दंडात्मक कारवाईवर भर न देता नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृतीही केली जात आहे. आगामी काळात तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे. 

यांना केला दंड ( AMC )

अमित किशोर वाकळे, नालेगाव वाघ गल्ली; सोनू शहाणे, महाजन गल्ली; कबीर बेकरी – राजेंद्र चेमटे, श्रीराम चौक; सद्गुरू सुपर मार्केट, पाइपलाइन रोड, सावेडी; महादेव ज्वेलर्स, पाइपलाइन रोड, सावेडी; सुरेखा चेमटे, पाइपलाइन रोड, सावेडी; जयंतिलाल शिवराम मोदी, महावीर नगर, सावेडी; सुवर्णम प्राईड हॉटेल, तारकपूर रोड; सुहास पुंड, बालिकाश्रम रोड; शकील अबुबकर पटेल, मुकुंद नगर; जगदीश भुवन, चितळे रोड; मिस मॅच दुकान, कापड बाजार; साई डेअरी अँड बेकर्स – वर्षा उगले, आंबेडकर चौक, बोल्हेगाव; विश्वरत्न प्रकाश बागुल, शिवरचना कॉलनी, गणेश चौक, बोल्हेगाव; गणेश बाळू राऊत, शिवरचना कॉलनी, गणेश चौक, बोल्हेगाव; मुधा ड्रेससेस, एम.जी. रोड.

दुष्काळी परिस्थितीमुळे उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेने दहा टक्के पाणी कपात लागू केली आहे. या उपाययोजनांच्या यशस्वितेसाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठेही पाण्याचा अपव्यय करू नये. नळांना आवश्यक त्या तोट्या बसवून घ्याव्यात आणि पाण्याचा जपून वापर करावा. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरूच राहणार असून, आगामी काळात तपासणी अधिक कडक केली जाईल.
– यशवंत डांगे, आयुक्त, अहिल्यानगर महापालिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here