
Drought : नगर : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता आणि दुष्काळाच्या (Drought) झळा दिवसेंदिवस वाढू लागल्या असून, ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाणीटंचाईची (Water scarcity) तीव्रता लक्षात घेता जिल्ह्यातील २५९ गावे आणि १ हजार ५६३ वाड्यांना तब्बल २९८ टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरच्या माध्यमातून ५ लाख २८ हजार १६३ नागरिकांची तहान भागविली जात आहे.
माणसांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई
पाथर्डी तालुक्यात १०० टँकरव्दारे ७८ गावे आणि ४६५ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. या तालुक्यातील सुमारे पावणे दोन लाख नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. माणसांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही टँकरच्या माध्यमातून करावी लागत असल्याने टंचाईची तीव्रता स्पष्ट होत आहे. कर्जत तालुक्यात ३९ टँकरव्दारे ४४ गावे आणि ३०९ वाड्यांतील ७८ हजार ७४४ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. अहिल्यानगर तालुक्यात ३५ टँकरव्दारे ३१ गावे आणि १८२ वाड्यांतील ६७ हजार ५९४ नागरिकांची तहान भागविली जात आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
३९ हजार ११६ नागरिकांना पाणीपुरवठा (Drought)
शेवगाव तालुक्यात ३९ गावे आणि २२७ वाड्यांना टँकर सुरू असून, ६७ हजार ९६ नागरिकांना पाणी दिले जात आहे. जामखेड तालुक्यात २८ गावे आणि ५२ वाड्यांसाठी ३१ टँकर सुरू असून, ३९ हजार ११६ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. पारनेरमध्ये १५ गावे आणि १५४ वाड्यांसाठी १९ टँकरव्दारे ४१ हजार ४०४ नागरिकांची तहान भागविली जात आहे. संगमनेर तालुक्यात १३ गावे आणि २२ वाड्यांना १३ टँकरव्दारे २० हजार २६४ नागरिकांना पाणी दिले जात आहे.
श्रीगोंदा तालुक्यात पाच गावे आणि ५९ वाड्यांसाठी पाच टँकर सुरू असून, १४ हजार २६३ नागरिकांना पाणीपुरवठा होत आहे. नेवासा तालुक्यात तीन गावे आणि १९ वाड्यांसाठी दोन टँकरव्दारे ५ हजार ४९८ नागरिकांना पाणी दिले जात आहे. पाणीटंचाईचे संकट आता केवळ ग्रामीण भागापुरते मर्यादित राहिलेले नाही. शेवगाव, कर्जत, पाथर्डी आणि पारनेर या शहरांमध्येही टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. पारनेर शहर आणि लगतच्या ३० वाड्यांतील १३ हजार ११९ नागरिकांसाठी १३ टँकर सुरू आहेत. पाथर्डी शहर व परिसरातील २५ वाड्यांसाठी तीन टँकरव्दारे सुमारे पाच हजार नागरिकांना पाणी दिले जात आहे. कर्जत शहर आणि लगतच्या १९ वाड्यांतील ५ हजार ४०० नागरिकांसाठी पाच टँकर सुरू आहेत. तर शेवगाव शहर व परिसरातील १७ वाड्यांतील २ हजार ६३० नागरिकांची तहान पाच टँकरव्दारे भागविली जात आहे.
३७ विहिरी, कूपनलिका अधिग्रहित (Drought)
टँकरसाठी पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ३७ विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यामध्ये जामखेड तालुक्यात सर्वाधिक १० विहिरी व कूपनलिकांचा समावेश आहे. मात्र, पाणीटंचाई वाढत असताना स्थानिक जलस्रोतही कोरडे पडू लागल्याने प्रशासनासमोर पाणी उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे काही ठिकाणी धरणातील पाणी आणून टँकरमध्ये भरून ते नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करावी लागत आहे. गावांमध्ये टँकर पोहोचल्यानंतर नागरिकांना पाणी भरता यावे, यासाठी ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. तसेच टँकरमध्ये पाणी भरण्याच्या पाच ठिकाणी जलशुध्दीकरण यंत्रणा बसविण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे.


