नगर : देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असलेली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI). आता याच एसबीआयच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्या गुरुवारी (ता.१९) बँकेच्या UPI सेवा सुमारे ४५ मिनिटांसाठी बंद (UPI services down for about 45 minutes) राहणार आहेत. बँकेने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. नियोजित देखभाल कामामुळे ही सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजून १५ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत SBI च्या UPI सेवांचा वापर करता येणार नाही. त्यामुळे या कालावधीत UPI द्वारे पैसे पाठवणे किंवा पेमेंट करणे शक्य होणार नाही.
नक्की वाचा : इन्स्टाग्रामवर आता अश्लील अन् हिंसक कंटेंटला चाप! मेटाकडून नियमांत मोठे बदल
स्टेट बँक ऑफ इंडियाची सोशल मीडियावर माहिती (SBI UPI )

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करून ग्राहकांना या नियोजित देखभाल कामाची माहिती दिली आहे. बँकेच्या पोस्टनुसार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.१५ ते २ वाजेपर्यंत SBI च्या UPI सेवा तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध नसतील. मात्र, देखभालीचे काम निर्धारित वेळेआधी पूर्ण होण्याची शक्यताही बँकेने व्यक्त केली आहे. या कालावधीत ग्राहकांना अखंडित सेवा मिळावी, यासाठी UPI Lite चा वापर सुरू ठेवता येईल, असेही बँकेने स्पष्ट केले आहे. ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल स्टेट बँकेने दिलगिरी व्यक्त केली आहे.
अवश्य वाचा : थंडी-उन्हाच्या खेळात ‘अक्वान’ चक्रीवादळाची एन्ट्री! महाराष्ट्रात हवामान बदलणार का?
UPI Lite सेवा सुरूच राहणार (SBI UPI )
ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे बँकेची UPI Lite सेवा या कालावधीत सुरू राहणार आहे. UPI Lite ही कमी रकमेच्या व्यवहारांसाठी तयार करण्यात आलेली पेमेंट सुविधा आहे. या सुविधेअंतर्गत ग्राहक आपल्या बँक खात्यातून पैसे UPI Lite वॉलेटमध्ये जमा करू शकतात. त्यानंतर वॉलेट मधील उपलब्ध शिल्लक रकमेतून प्रत्येक व्यवहारासाठी UPI PIN टाकण्याची गरज न पडता पेमेंट करता येते. मात्र, यासाठी संबंधित UPI अॅपमध्ये UPI Lite ची सुविधा उपलब्ध आणि सक्रिय असणे आवश्यक आहे.



