
Castribe Mahasangh : नगर : माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवून सहकार विभागातील (Cooperation Department) कर्मचाऱ्यांविरोधात कथित खोटे तक्रार अर्ज दाखल करणे आणि त्या अर्जांच्या आधारे कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देण्यासाठी खातेनिहाय चौकशा लावण्याच्या प्रकाराचा महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब महासंघाच्या (Castribe Mahasangh) वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या निषेधार्थ शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील बाजूस असलेल्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर (District Deputy Registrar’s Office) ढोल-ताशांच्या गजरात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी संतप्त आंदोलकांनी खोट्या तक्रारी आणि चौकशीच्या प्रतींची होळी करून प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदविला.
नक्की वाचा : शहरातील अतिक्रमणांवर महानगरपालिकेकडून ‘हातोडा’; अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई सुरू
चौकशा लावल्या जात असल्याचा आरोप
या आंदोलनात महासंघाचे राज्याध्यक्ष एन. एम. पवळे, वसंत थोरात, के. के. जाधव, सुहास धीवर, ना. म. साठे, भाऊसाहेब सिनारे, अश्विनी खरपुडे, ज्योती हराळे, सुरेश बनसोडे, डॅनियल पारधे, भारती रोहकले यांच्यासह सहकार विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेरील व्यक्तींकडून होणाऱ्या त्रासापासून संरक्षण देणे, त्यांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, हे संबंधित कार्यालयप्रमुखांचे प्राथमिक कर्तव्य आहे. मात्र, कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याऐवजी जिल्हा उपनिबंधकांकडून त्यांच्याच विरोधात खातेनिहाय चौकशा लावल्या जात असल्याचा आरोप महासंघाने केला आहे. तसेच विविध तक्रार अर्जांच्या आधारे कर्मचाऱ्यांकडून लेखी खुलासे मागविणे, जबाब नोंदविणे आणि प्रशासकीय प्रक्रियांचा वापर करून त्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कामकाजाचे वातावरणही अस्वस्थस (Castribe Mahasangh)
या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांना दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून कार्यालयातील कामकाजाचे वातावरणही अस्वस्थ बनले आहे. बाहेरील व्यक्तींकडून होणाऱ्या कथित त्रासाला आळा घालण्याऐवजी कर्मचाऱ्यांनाच चौकशीच्या प्रक्रियेत अडकविले जात असल्याने महासंघाने नाराजी व्यक्त केली.जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी बाहेरील व्यक्तींकडून होणाऱ्या त्रासासंदर्भात पोलीस खात्याकडे लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींची माहिती जिल्हा उपनिबंधकांना देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली होती. यासंदर्भात महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांशी प्रत्यक्ष चर्चा केली होती. मात्र, वारंवार मागणी करूनही या प्रकरणात अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाल्याचे महासंघाला कळविण्यात आलेले नाही. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांमधील नाराजी अधिक तीव्र झाल्याचे राज्याध्यक्ष एन. एम. पवळे यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार त्वरित थांबवावेत
या आंदोलनाच्या माध्यमातून महासंघाने प्रशासनासमोर विविध मागण्या मांडल्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार विभागातील कर्मचाऱ्यांविरोधात नियमबाह्य पद्धतीने सुरू करण्यात आलेल्या खातेनिहाय चौकशा तातडीने रद्द कराव्यात, चुकीची माहिती देऊन अथवा तक्रार अर्जांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार त्वरित थांबवावेत, तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहिल्यानगर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना पोलीस खात्यामार्फत आवश्यक संरक्षण मिळवून द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या. सहाय्यक सहकारी अधिकारी डी. डी. पारधे आणि वरिष्ठ लिपिक ए. पी. खरपुडे यांनी 21 सप्टेंबर 2026 रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची योग्य पद्धतीने चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. तसेच या प्रक्रियेत प्रशासनाने पूर्ण सहकार्य करावे, अशी मागणीही महासंघाने केली आहे.


