ACB : नगर : शिर्डी येथील उपविभागीय कार्यालयात संलग्न असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने वाळू वाहतुकीत अडथळा निर्माण न करता वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा ४० हजार रुपयांची लाच (Bribe) मागून ती स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात पकडले. अशोक रामा शिंदे (वय ४६) असे ताब्यात घेण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे (Police Constable) नाव आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा : संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन; संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन
५० हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ३२ वर्षीय असून शेती आणि वाहतूक व्यवसाय करतात. त्यांचा मुख्य व्यवसाय गौण खनिज वाहतुकीचा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना वाळू वाहतुकीची ऑर्डर मिळाली होती. त्यानुसार ते हायवा वाहनातून वाळूची वाहतूक करत असताना २२ नोव्हेंबर २०२६ रोजी आरोपी पोलीस हवालदाराने त्यांचे वाहन अडवले. वाहनावर कारवाई न करण्यासाठी तसेच वाळू वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्याच्या मोबदल्यात आरोपीने तक्रारदाराकडे दरमहा ५० हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने २५ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
लाच स्वीकारताना रंगेहात पकडले (ACB)
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पंचांसमक्ष झालेल्या चर्चेत आरोपीने दरमहा ४० हजार रुपये देण्याची मागणी मान्य केली. त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी कोपरगाव तालुक्यातील सिनार-शिर्डी रोडलगत तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.
या प्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक योगेश भास्कर शिंदे यांच्या पथकाने केली. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे आणि अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मेराळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.



