Anti Corruption Bureau Maharashtra : एक कोटीची लाच प्रकरणातील ‘वाघ’ जेरबंद

प्रमुख आरोपी एमआयडीसीचा तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ पसार होता. त्याला आज (मंगळवारी) नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

0
150

नगर : नगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या एमआयडीसी सहाय्यक अभियंत्याला ३ नोव्हेंबर रोजी एक कोटीची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau) पथकाने रंगेहाथ पकडले होते. त्यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील एमआयडीसीचा सहाय्यक अभियंता अमित गायकवाडला अटक करण्यात आली होती. तर प्रमुख आरोपी एमआयडीसीचा तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ पसार होता. त्याला आज (मंगळवारी) नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

हे देखील वाचा : राम शिंदेंनी ‘राष्ट्रवादी’ला पाडले खिंडार; शेकडो समर्थकांसह ‘या’ युवा नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

सविस्तर माहिती अशी की, नगर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहाय्यक अभियंता यास तब्बल एक कोटींची लाच घेताना नाशिक येथील लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ३ नोव्हेंबरला सायंकाळी रंगेहात पकडले. अमित गायकवाड (वय ३२, रा.नागापूर ) असे या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ नोव्हेंबरला पहाटे तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ व सहाय्यक अभियंता अमित गायकवाड या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून गणेश वाघ पसार होता. 

नक्की वाचा : ऐन सणासुदीत दूध दरात घसरण; शेतकऱ्यांना आर्थिक फटका

नगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत ठेकेदाराने १०० एम एम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे २ कोटी ९९ लाख रुपये बिल होते. या बिलाची ठेकेदाराने मागणी केली. तेव्हा मागील तारखेचे बिल आउटवर्ड करून त्यावर तत्कालीन उपअभियंता गणेश वाघ यांची स्वाक्षरी घेण्यासाठी गायकवाड यांनी ठेकेदाराकडे तब्बल एक कोटीच्या लाचेची मागणी केली. दरम्यान ठेकेदाराने नाशिक येथील लाच प्रतिबंधक विभागाला कळविले. ही रक्कम ३ नोव्हेंबरला सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नगर- छत्रपती संभाजी नगर रस्त्यावरील शेंडी बायपास येथे स्वीकारण्याचे ठरले. त्यानुसार गायकवाड हा रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत आला असता त्याला लाच स्वीकारताना नाशिक येथील पथकाने रंगेहात पकडले होते. त्याला ताब्यात घेऊन शासकीय विश्रामगृहात आणण्यात आले होते.

रात्री उशिरापर्यंत पंचनामा झाला. या प्रकरणी गायकवाड यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाई नाशिक येथील लाच प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर यांच्या पथकाने केली होती. त्यांच्याच पथकाने आज गणेश वाघला मुंबईकडून धुळ्याकडे जात असताना अटक केले. वाघ याला आज नगरमधील जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. या प्रकरणातील पुढील सुनावणी १९ नोव्हेंबरला होणार आहे. गणेश वाघ हा सध्या धुळे येथील एमआयडीसी कार्यालयात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होता.