Murder : शेतकऱ्याचा खून करणारे तिघे गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
150

नगर : पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील कडगाव शिवारात शेतकऱ्याचा खून (Murder) करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज (मंगळवारी) जेरबंद केले. भाऊसाहेब अशोक निकम (वय २२, रा. लोहगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), अशोक संजय गिते (वय २३) व श्रीकांत रावसाहेब सूर्यवंशी (वय २०, दोघे रा. कडगाव ता. पाथर्डी) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार करण अजिनाथ कोरडे (रा. कडगाव, ता. पाथर्डी) असे पसार आरोपीचे नाव आहे.

हे देखील वाचा : राम शिंदेंनी ‘राष्ट्रवादी’ला पाडले खिंडार; शेकडो समर्थकांसह ‘या’ युवा नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

कडगाव येथील कारभारी रामदास शिरसाठ हे शेतकरी शुक्रवारी (ता. १०) रात्री कापसाच्या गोण्या ठेवलेल्या ठिकाणी झोपले होते. त्यावेळी आरोपींनी गोण्या चोरण्याचा प्रयत्न केला. त्या आवाजाने कारभारी शिरसाठ जागे झाले. त्यांनी आरोपींपैकी काही जणांना ओळखले. त्यामुळे आरोपींनी कारभारी शिरसाठ यांचा नाक व तोंड दाबून खून केला. तसेच चोरी केलेल्या कापसाच्या गोण्यांना उसात टाकून ते पसार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी ही बाब उघड झाल्यावर आरोपींच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात सुमनबाई कारभारी शिरसाठ यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दरोडा व खुनाचा गुन्हा दाखल करून घेतला. या घटनेमुळे ऐन दिवाळीत कडगावमध्ये शोककळा आहे.


नक्की वाचा : राज्यात पुढील २४ तासाचा पावसाची शक्यता

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर त्यांच्या पथकासह घटनास्थळी गेले. त्यांनी पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने कापसाचे व्यापारी, शिरसाठ यांच्या शेतावरील मजूर, परिसरातील सराईत आरोपी यांची माहिती काढण्यास सुरूवात केली. यात उपलब्ध माहितीच्या आधारे पथकाने तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने तीनही आरोपींना अटक केली. त्यांना पुढील तपासासाठी पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले. जेरबंद आरोपींपैकी अशोक गिते हा सराईत गुन्हेगार आहे. याच्यावर यापूर्वी तीन जिल्ह्यांत सहा गुन्हे दाखल आहेत. पसार आरोपी करण कोरडेचा पथकाकडून शोध सुरू आहे.