Bagul panduga : नगर : निसर्गाशी एकरूप होत पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचा संदेश देणारा पद्मशाली समाजाचा (Padmasali society) पारंपरिक ‘बागुल पंडुगा’ (Bagul panduga) सण यंदा ३१ जुलै रोजी साजरा करण्यात येणार आहे. या सणाच्या माध्यमातून निसर्ग, पर्यावरण आणि मानवी जीवन यांचा अतूट संबंध अधोरेखित केला जात असून, समाजबांधवांनी या निमित्ताने वृक्षसंवर्धनाचा संकल्प (Resolution of tree conservation) करावा, असे आवाहन पद्मशाली समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा स्वाती सिरसुल यांनी केले.
नक्की वाचा : फिरोदिया शिवाजियन्सच्या आठव्या आंतरशालेय स्पर्धेला प्रारंभ
सण-उत्सवांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक संदेश
पद्मशाली समाजातील पूर्वजांनी भविष्यातील दूरगामी विचार करून निसर्गाचे संतुलन अबाधित राहावे, वृक्षसंपदा टिकून राहावी आणि मानवाने निसर्गाशी नेहमी एकरूप होऊन त्याचे संवर्धन व संरक्षण करावे, यासाठी विविध धार्मिक सण-उत्सवांच्या माध्यमातून समाजाला पर्यावरणपूरक संदेश दिला आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा पारंपरिक सण म्हणजे ‘बागुल पंडुगा’ होय. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या शुक्रवारी हा सण साजरा करण्याची परंपरा असल्याचे स्वाती सिरसुल यांनी सांगितले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
दोनशे ते अडीचशे वर्षांची परंपरा (Bagul panduga)
आंध्र प्रदेश तसेच सध्याच्या तेलंगणा राज्यातील जाणकारांच्या माहितीनुसार, बागुल पंडुगा सणाची परंपरा साधारण २०० ते २५० वर्षांपासून सुरू आहे. तेलंगणातील आरमूर, मिठपेल्ली, कोरुटला, करीमनगर, निजामाबाद, सिद्धीपेठ, सिरसिल्ला, कामारेड्डी, दुब्बाका, येमूलवाडा तसेच हैदराबाद शहर व ग्रामीण भागातील पद्मशाली समाजबांधव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. आषाढ महिन्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे विविध संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे मानवाचे आरोग्य सुरक्षित राहावे, संतुलित पर्जन्यवृष्टी व्हावी आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, या भावनेतून या सणाची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.
या सणाला धार्मिकतेसोबतच सामाजिक आणि पर्यावरणीय महत्त्वही प्राप्त
या दिवशी निसर्गातील आद्यशक्ती मानल्या जाणाऱ्या लक्ष्मीदेवी (लच्छमम्मातल्ली) आणि शीतलादेवी (पोशम्मातल्ली) यांची भक्तिभावाने पूजा केली जाते. देवीला जलाभिषेक, पुष्प, दीप-धूप आरती करून गोड पुरी, भात, दहीभात, त्यावर ओवा-फुटाणे तसेच मेथीची भाजी असा पारंपरिक नैवेद्य दाखविला जातो. खण-नारळाने देवीची ओटी भरून पूजा केली जाते. या निमित्ताने देवीची यात्रा व धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. पूर्वी हा सण बागेत अथवा वनराईमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन साजरा करण्याची प्रथा होती. कुटुंबीय, नातेवाईक व समाजबांधव एकत्र येऊन निसर्गाच्या सान्निध्यात पूजा, नैवेद्य व भोजनाचा आनंद घेत असत. त्यामुळे या सणाला धार्मिकतेसोबतच सामाजिक आणि पर्यावरणीय महत्त्वही प्राप्त झाले आहे.
मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून सिमेंट-काँक्रीटच्या इमारती उभ्या
मात्र, अलीकडच्या काळात शहरांचा झपाट्याने विस्तार होत असून, मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून सिमेंट-काँक्रीटच्या इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे शहरांच्या आसपासची हिरवाई आणि झाडी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. परिणामी, निसर्गाच्या सान्निध्यात बागेत जाऊन बागुल पंडुगा साजरा करण्याची पूर्वीची परंपरा हळूहळू लोप पावत असून, आता अनेक समाजबांधव हा सण आपल्या घरीच साजरा करतात. आजच्या काळात वृक्षतोडीला विरोध करून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे, लावलेल्या झाडांचे नियमित संगोपन व संरक्षण करणे ही जबाबदारी समाजाने स्वीकारली, तर बागुल पंडुगा सणाचा खरा उद्देश साध्य होईल, असे स्वाती सिरसुल यांनी सांगितले.
‘ग्रीन सिटी’ उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन
अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उपमहापौर धनंजय जाधव यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या ‘ग्रीन सिटी – झाडे लावा, झाडे जगवा’ या पर्यावरणपूरक उपक्रमाला समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा. केवळ वृक्षलागवड न करता लावलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन व संरक्षण करण्याची जबाबदारीही स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या व अन्य प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळून पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अहिल्यानगरमध्ये दोन ठिकाणी देवीची मंदिरे
तोफखाना भागातील मोची गल्ली येथील शीतलादेवी (पोशम्मा) मंदिर तसेच बालिकाश्रम रोडवरील जाधव मळा येथील लक्ष्मीआई (लच्छमा) मंदिरात बागुल पंडुगानिमित्त सकाळपासूनच महिला, पुरुष, देवीचे जागर करणारे पोतराज , डोक्यावर कलश घेऊन भक्ती भावाने वाजत गाजत देवीची यात्रा निघते. .
अहिल्यानगरसह मूळ तेलंगणा राज्यातील पद्मशाली समाजबांधव आजही हा सण एकाच दिवशी साजरा करतात. मात्र महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सोलापूर, नांदेड, जालना यांसह अन्य शहरांमध्ये पद्मशाली समाजबांधव ‘पोशम्मा पडुगा’ या नावाने आषाढ महिन्यात आपल्या सोयीनुसार, विशेषतः रविवारच्या सुट्टीच्या दिवशी हा सण साजरा करतात.
निसर्ग, पर्यावरण आणि कुटुंबाशी एकरूप होण्याचा संदेश देणाऱ्या या पारंपरिक सणानिमित्त पद्मशाली समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा स्वाती सिरसुल, समाजाच्या माजी अध्यक्षा शामला बोरा, तसेच रंजना क्यादर, लता पुलगम, नीता मंचे, विजया बोडके, शारदा सुंकी, रत्ना कोटा, रुक्मिणी संदूपटला, भारती सुरम, सोनाली दूडम, रेणुका गाली, पद्मा म्याना, ज्योती बिज्या, सारिका म्याना, ललिता बल्लाळ, स्वरूप कुचन, अंबिका बोगा, सोनी शामल, सुनीता कुरापट्टी आदी महिला कार्यकर्त्यांनी पद्मशाली समाज बांधव-भगिनींना बागुल पंडुगा सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.



