Maharashtra Rain : राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

0
Maharashtra Rain : राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra Rain : राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट

नगर : भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यभरात पावसाने धुव्वाधार बॅटिंग (Maharashtra Rain) सुरु केली आहे. यामध्ये अनेक जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. तर येणारे २४ तास महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहेत. हवामान विभागाने आज राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज (Forecast of heavy rainfall) वर्तवला आहे.

नक्की वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवीन कार्यालयामुळे सरकारला २०० कोटींचा फायदा

विदर्भातील ‘या’ जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ (Maharashtra Rain)

मान्सूनची हालचाल प्रामुख्याने ओडिशावरील तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे होत आहे, जो आता पश्चिमेकडील विदर्भ आणि छत्तीसगडच्या दिशेने सरकत आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सूनचा जोर पुन्हा वाढला आहे. हवामान विभागाने विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात ३१ जुलैपर्यंत अतिवृष्टी, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. जळगावसाठीही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अवश्य वाचा : ‘पॅलेट गनच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालता येणार नाही’, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

सर्व शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश (Maharashtra Rain)

अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. यात पावसाच्या विळख्यात सापडलेल्या १०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. नांदगाव खंडेश्वर मधील धामक, धानोरा गुरव, मंगरूळ चव्हाळा, खेड पिंपरी, परस मंडळ, दिघी कोल्हे या गावासह अनेक गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. गावाला नदी नाल्याचे स्वरूप आले. तर सातरगाव परिसरात मेंढी नाल्याच्या पुरात आल्याने यात एक दुचाकीस्वार वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नांदगाव खंडेश्वर शहरात देखील पावसाने कहर माजवला आहे. गावातील शेती खरडून निघाल्या आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सर्व शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. हा आदेश सर्व शासकीय, अनुदानित व खासगी शैक्षणिक संस्थांना लागू राहणार आहे. संभाव्य पूरस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही जीवितहानी किंवा अनुचित घटना घडू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.