Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर पाथर्डीत पोलीस अधीक्षकांनी केली पाहणी

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर पाथर्डीत पोलीस अधीक्षकांनी केली पाहणी

0
Police
Police

Manoj Jarange Patil : पाथर्डी : मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी येथे जिल्हा पोलीस (Police) प्रमुख राकेश ओला यांनी कायदा-सुव्यवस्थेची (Law and order) पाहणी केली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे आदी उपस्थित होते. 

हे देखील वाचा : भगवं वादळ मुंबईच्या दिशेने रवाना; मनाेज जरांगे पाटलांची उद्या नगरमध्ये दीडशे एकरावर सभा

शंभर एकर परिसरावर जेवण (Manoj Jarange Patil)

मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मुंबईच्या दिशेने जात आहेत. २१ जानेवारी रोजी ही पदयात्रा पाथर्डी तालुक्यातून जाणार आहे. यादिवशी सकाळी आठ वाजता पदयात्रा तालुक्यातील मिडसांगवी गावात प्रवेश करणार आहे. या ठिकाणी सुमारे चार टन पोह्याचा नाष्टा, पाणी व इतर अल्प उपहाराची व्यवस्था या परिसरातील गावच्या नागरिकांनी केली आहे. पदयात्रेतील लोकांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था फुंदे टाकळी फाटा तर याच पुढे चार किलोमिटर अंतरावर दुसऱ्या ठिकाणी जेवण व्यवस्था पाथर्डीकडे जातांना वाळुंज, आगसखांड शिवारात केली गेली आहे. तीन ठिकाणी मिळून सुमारे शंभर एकरच्या परिसरावर जेवणाचे स्टॉल, पाणी, वाहन पार्किंग अशी व्यवस्था सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

नक्की वाचा : साडेबारा एकर भूखंड प्रकरणात ‘त्या’ १०० ते १५० कुटुंबांना तूर्तास दिलासा

दहा हजार स्वयंसेवक

गावा गावातील लोकांनी जेवणाची व्यवस्था करून त्यासाठी लागणारे पाण्याचे टँकर, पत्रावळी, ग्लास ही सुद्धा सामग्री घेऊन येण्याची जबाबदारी संबंधित गावाच्या समन्वयकाडे दिली आहे. वाळुंज,आगखांड शिवारातील जेवणाच्या ठिकाणी सुमारे दोन टन पिठले भाकरीबरोबर जेवणासाठी केले जाणार आहे. या जागेवर दोन्ही बाजूने जेवणाचे स्टॉल लावले जाणार आहेत. त्या ठिकाणी पदयात्रेतील लोक स्टॉलवर जाऊन स्वतः जेवण घेणार अशी व्यवस्था या ठिकाणी आयोजकांकडून केली आहे.  एक छोटासा स्टेज व लाऊडस्पीकर लावण्यात आला आहे. या माध्यमातून आलेला लोकांना सूचना तर जरांगे पाटील हे उपस्थितांना या ठिकाणाहून वेळप्रसंगी संबोधित करू शकतात. केळी, खिचडी, मसाले भात, लापशी, चपाती, भाकरी, सुकी भाजी, चटणी व ठेचा अशा पद्धतीने जेवणाची व्यवस्था पदयात्रेतील लोकांसाठी स्वयं स्फूर्तीने नागरिकांनी केली आहे. जेवणाचे पाकीटही स्टॉलवर ठेवले गेले आहे. शुद्ध बॉटल पिण्याचे पाण्याचे हजारो बॉक्स देण्यात येत आहे. पाथर्डी, शेवगाव त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार,आष्टी येथीलही नागरिकांनी या पदयात्रेसाठी आपला सहयोग दिला आहे. सुमारे दहा हजाराच्या आसपास तरुण स्वयंसेवक या ठिकाणी आपली सेवा देणार आहेत.

जेसीबीतून फुलांद्वारे पदयात्रेचे स्वागत (Manoj Jarange Patil)

अवश्य वाचा : जिल्हाधिकाऱ्यांचे नगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी; पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई

पदयात्रेच्या स्वागतासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागत कामानी, फ्लेक्स बोर्ड, रस्त्याच्या दोन्ही बाजूने भगवे झेंडे लावण्यात आले आहे. फुंदे टाकळी फाटा व पाथर्डी शहरात नाईक चौकात आयोजकांकडून मनोज जरांगे यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली असून जेसीबीतून फुलांद्वारे पदयात्रेचे स्वागत केले जाणार आहे. मिडसांगवी ते अहमदनगरपर्यंत सुमारे ८५ किलोमीटरचा पदयात्रा रस्त्याची पाहणी जिल्हा पोलीस प्रमुख ओला व त्यांच्या पथकाने पाहणी करून या ठिकाणच्या आयोजकांना सूचना केल्या आहेत. पाथर्डीतील सुमारे चाळीस मराठा आंदोलक समन्वयकांना मराठा आरक्षण पद यात्रेच्या अनुषंगाने मार्गदर्शन सूचना लेखी स्वरुपात दिल्या आहेत. सूचना पत्रक म्हटले आहे की, दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे, जेणेकरून न्यायालयाचा अपमान होणार नाही, असेही या सूचनापत्रात दिले आहे. याबाबत पाथर्डी पोलीस निरीक्षक यांच्या स्वाक्षरीने हे मार्गदर्शक सूचना पत्र देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here