Movement : अकोले : हिरड्याला हमीभाव (Guaranteed price) मिळावा, हिरड्याची सरकारी खरेदी सुरू व्हावी व भंडारदरा धरणात (Bhandardara Dam) बुडीत बंधारे बांधून आदिवासी शेतकऱ्यांना (Tribal farmers) हक्काचे पाणी मिळावे, या मागण्यांसाठी किसान सभेच्यावतीने राजूर (ता.अकोले) येथे महामुक्काम आंदोलन (Movement) केले.
नक्की वाचा : जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात संगमनेरात तीव्र आंदोलन
हिरडा हे आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे एक प्रमुख साधन आहे. मात्र सरकारने अनेक वर्षांपासून बाळहिरड्याची सरकारी खरेदी बंद केली आहे. किसान सभेने जुन्नर, आंबेगाव व अकोले तालुक्यात याप्रश्नावर जोरदार आंदोलने केली. नाशिक येथे आदिवासी आयुक्त कार्यालयावर अहमदनगर व पुणे जिल्ह्यांच्यावतीने किसान सभेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले व राज्य सहसचिव डॉ. अमोल वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्र्यांनी हिरडा खरेदीबाबत लेखी आश्वासन दिले. मंत्रालयस्तरावर याबाबत बैठकही झाली. आदिवासी महामंडळ व आदिवासी विभागाच्यावतीने जानेवारी महिन्यात हिरड्यांचा हमीभाव जाहीर करू असे आश्वासन याप्रसंगी देण्यात आले होते. सरकारने आश्वासन पाळावे, हिरड्याला हमीभाव जाहीर करावा व बाळहिरड्याची सरकारी खरेदी येत्या हंगामात सुरू करून आदिवासी शेतकऱ्यांना न्याय द्यावा, ही प्रमुख मागणी या आंदोलनाच्या निमित्ताने करण्यात आली आहे. आंदोलनाचा रविवारी (ता.7) दुसरा दिवस असून आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे व श्रमिकांचे इतरही विविध प्रश्न आंदोलनाच्या निमित्ताने केंद्रस्थानी येत आहेत.
हे देखील वाचा : ग्रंथ प्रदर्शनाला पारनेरकरांचा उदंड प्रतिसाद
भंडारदरा धरणाच्या आजूबाजूच्या गावांना दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. हे पाणी या गावांपासून दूर भिंतीकडे गेल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी येथील आदिवासी भगिनींना दूरवरून डोक्यावर पाणी आणावे लागते. यावर मार्ग काढण्यासाठी भंडारदरा धरणात बुडीत बंधारे बांधावेत ही किसान सभेची व येथील परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांची मागणी आहे. महामुक्काम आंदोलनाने हा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणला असून जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग व कृषी विभागाने संयुक्त सर्वेक्षण करून बुडीत बंधारे प्रस्तावित करावेत व आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी द्यावे अशी मागणीही किसान सभेने आंदोलनामध्ये केली आहे.
आदिवासी भागात अद्यापही अनेक वाड्यांमध्ये वीज पोहोचलेली नाही, पिण्याचे पाणी, शिक्षण, रोजगार, आरोग्य यांचे प्रश्न गंभीर झालेले आहेत. यासाठी राजूर शहरामध्ये मंडप टाकून अशाप्रकारे तीन दिवस कष्टकरी बसले आहेत. अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सदाशिव साबळे, किसान सभेचे राज्य समिती सदस्य नामदेव भांगरे, समशेरपूरचे सरपंच एकनाथ मेंगाळ, शिवराम लहामटे, वसंत वाघ, अर्जुन गंभीरे, राजू गंभीरे, भीमा मुठे, कुसा मधे, लक्ष्मण घोडे, नवसु मधे, बहिरु रेंगडे, लक्ष्मण घोडे, सोमा मधे, गणपत मधे, दुंदा मुठे, नवसु श्रावणा मधे, देवराम उघडे, एकनाथ गिऱ्हे, भीमा कोंडार, नाथा भौरले आदी कार्यकर्ते आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. भाकपचे ओमकार नवाळी, शिवसेनेचे संतोष मुर्तडक व विद्रोही चळवळीचे स्वप्निल धांडे यांनी आंदोलनास सक्रिय पाठिंबा दिला आहे.