Murder : नगर : पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करुन तिचा खून (Murder) करणाऱ्या पतीला श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने (District and Sessions Court) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राहुल सुरेश भोसले (वय ३३, रा. अजंठानगर, चिंचवड, पुणे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे (Accused) नाव आहे.
अवश्य वाचा : जिल्ह्यात १७ पोलीस निरीक्षक व ७ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
राहुल छळ करत असल्याची केली होती तक्रार (Murder)
राहुल भोसलेचे दीपाली भोसलेशी १५ जुलै २०१२ला लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. दीपालीने जून २०२१ला भरोसा सेलमध्ये राहुल भोसले विरोधात फिर्याद दिली होती. यात तिने राहुल शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचे म्हटले होते. त्यानुसार कर्जत पोलीस ठाण्यात राहुल विरोधात गुन्हा दाखल झाला होता. २२ ऑक्टोबर २०२१ला राहुलने राशीन येथे दीपालीला त्याचा मोबाईल मागितला. मात्र, तो तिच्या जवळ नसल्याने राहुलने दीपालीच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यावेळी दीपालीची बहीण लता गंगाराम आढाव (रा. राशिन) तेथे आली. तिच्या डोळ्याजवळ राहुलने चाकूचा वार केला. जखमी लताने हातातील जेवणाच्या डब्याने राहुलवर प्रतिहल्ला चढविल्याने तो तिथून पळून केला. लताने तिच्या आणखी एक बहिणीच्या मदतीने दीपालीला उपचारासाठी रुग्णालयात नेले मात्र, तत्पूर्वीच रस्त्यात तिचा मृत्यू झाला. लताने दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात राहुल विरोधात खून व घातक शस्त्राने हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नक्की वाचा : मोदींसमोर हात पसरवण्याची गरज नाही ;आम्ही लढून आरक्षण मिळवणार : जरांगे
जन्मठेप तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा (Murder)
या प्रकरणी पोलीस निरीक्षक सतीश गावित व डी. एस. मुंडे यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या खटल्यात सरकारी पक्षाने १६ साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी, साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी व पंच यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संगीता ढगे यांनी काम पाहिले. न्यायालयासमोर आलेला साक्षी-पुरावा व सरकारी अभियोक्त्याचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. न्यायालयाने राहुल भोसलेला खुनाच्या गुन्ह्यात दोषी धरून जन्मठेप तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. घातक शस्त्राने हल्ला प्रकरणी दोन वर्षे कैद व एक हजार रुपये दंड. दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.
अवश्य वाचा : जिल्ह्यात १७ पोलीस निरीक्षक व ७ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या