नगर : भारतात २६ जानेवारीला होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) उपस्थित राहणार आहेत. इमॅन्युएल मॅक्रॉन आज (ता.२५) पासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. ते राजस्थानची राजधानी जयपूर (jaipur) येथून या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरमधील आमेर किल्ला, हवा महल आणि खगोलशास्त्रीय वेधशाळा ‘जंतर मंतरला ते भेट देतील.
नक्की वाचा : प्रजासत्ताकदिनी राजपथावर अवतरणार शिवरायांचा चित्ररथ
भारतातील प्रजासत्ताक दिनाच्या या भव्य कार्यक्रमात सहभागी होणारे इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्सचे सहावे नेते असतील. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन सुमारे सहा तास जयपूरमध्ये राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रोड शोमध्येही ते सहभागी होणार आहेत. हॉटेल ताज, रामबाग पॅलेस येथे दोन्ही नेते भारत-फ्रान्स संबंध आणि विविध भू-राजकीय घडामोडींवर व्यापक चर्चा करणार आहेत.
पंतप्रधान मोदी करणार फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत (Republic Day 2024 )
पंतप्रधान कार्यालयाने जरी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी संध्याकाळी ५.३० वाजता इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे स्वागत करणार आहेत. त्यांनतर दोघे जंतर मंतर, हवा महल आणि अल्बर्ट हॉल संग्रहालयासह शहरातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या विविध ठिकाणांना भेट देतील. आज रात्री ८.५० मिनिटांनी ते दिल्लीला रवाना होणार आहेत.
अवश्य वाचा : ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण
इमॅन्युएल मॅक्रॉन प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे (Republic Day 2024 )
इमॅन्युएल मॅक्रॉन उद्या (ता.२६) प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात फ्रान्सचे ९५ सदस्यीय मार्चिंग पथक आणि ३३ सदस्यीय बँड पथकही परेडमध्ये सहभागी होणार आहे. दोन राफेल लढाऊ विमाने आणि फ्रेंच हवाई दलाचे एअरबस A330 मल्टी-रोल टँकर वाहतूक विमानही या समारंभात सहभागी होणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या मेजवानीला इमॅन्युएल मॅक्रॉन उपस्थित राहणार आहेत. उद्या (ता. २६) संध्याकाळी ७.१० वाजता मुर्मू यांच्यासोबत ते बैठक घेणार आहेत. आणि त्याच रात्री १० वाजता ते दिल्लीहून फ्रान्सला रवाना होतील.