नगर : विश्वचषक (world cup) एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत आज (रविवारी) भारत व गत विश्वविजेता इंग्लंड (IND-ENG) यांच्यात लखनौ येथे साखळी सामना खेळविण्यात आला. यात भारतीय (India) संघाच्या भेदक गोलंदाजी समोर इंग्लंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. भारताने हा सामना १०० धावांनी जिंकला.
हे देखील वाचा : उपसमितीला ११,५३० कुणबी नोंदी सापडल्या; उद्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार : मुख्यमंत्र्यांची माहिती
इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने शुभमन गिल (९ धावा), विराट कोहली (० धावा) व श्रेयस अय्यर (४ धावा) यांना झटपट बाद केले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने (८७ धावा) के.एल. राहुल (३९ धावा) व सूर्यकुमार यादव (४९ धावा) यांना बरोबर घेत संघाला सन्मानजनक स्थितीत आणले. भारतीय संघाने नऊ गड्यांच्या मोबदल्यात ५० षटकांत २२९ धावा केल्या. इंग्लंडच्या डेव्हिड विलीने सर्वाधिक तीन फलंदाज बाद केले. क्रिस्टोफर वोक्स व आदिल रशीद यांनी प्रत्येकी दोन तर मार्क वुडने एक फलंदाज बाद केला.
नक्की वाचा : विश्वचषकात भारताचा वारू सुसाट
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह व मोहम्मद शामी यांनी इंग्लंडच्या पहिल्या फळीचे फलंदाज बाद केले. मधल्या फळीतील फलंदाज कुलदीप यादव व रवींद्र जडेजाच्या फिरकीत अडकले. शेवटच्या फळीला बुमराह व शामीने उद्धवस्त करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंड कडून लियाम लिविंगस्टोनने सर्वाधिक २७ धावा केल्या. मोहम्मद शामीने चार, बुमराहने तीन, कुलदीप यादवने दोन तर जडेजाने एक फलंदाज बाद केला. इंग्लंडचा संपूर्ण संघ ३४.५ षटकांत १२९ धावांत बाद झाला. रोहित शर्मा सामनावीर ठरला.
या विजयामुळे भारत अंकतालिकेत प्रथम स्थानी आला आहे तर इंग्लंड शेवटच्या स्थानावर फेकला गेला आहे. भारतीय संघ उपांत्यफेरीत पोहोचला आहे. अंकतालिकेत दक्षिण आफ्रिका दुसऱ्या, न्युझीलँड तिसऱ्या, ऑस्ट्रेलिया चौथ्या, श्रीलंका पाचव्या, पाकिस्तान सहाव्या, अफगाणिस्तान सातव्या, नेदरलँड आठव्या तर बांग्लादेश नवव्या स्थानी आहे. अफगाणिस्तान व श्रीलंका यांच्यात आज पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सामना सुरू झाला आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.