Plastic confiscation | अकोले: येथील नगरपंचायतच्या प्लास्टिक बंदी पथकाने शहरात धडक कारवाई करत ६५ किलो बंदी घातलेले प्लास्टिक जप्त (Plastic confiscation) केले आहे. महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल उत्पादने (उत्पादन, वापर, विक्री, साठा व वाहतूक) प्रतिबंध अधिनियम २०१८ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत अकोले नगरपंचायतीकडून प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार गुरुवारी शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर, महात्मा फुले चौक, कोल्हार रस्ता तसेच इतर व्यापारी भागात विशेष तपासणी मोहीम राबविली.
भविष्यात नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत सक्त सूचना (Plastic confiscation)
तपासणी दरम्यान काही व्यापारी व व्यावसायिकांकडे बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्या, डिस्पोजेबल प्लास्टिक साहित्य व इतर प्रतिबंधित वस्तूंचा साठा आढळून आला. संबंधितांकडून एकूण ६५ किलो बंदी घातलेले प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले असून नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच संबंधितांना भविष्यात नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. सदर कारवाई मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग, स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाद्वारे करण्यात आली.



