
नगर : छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आणि टिपू सुलतान (Tipu Sultan) यांच्या वक्तव्यावरुन चौफेरे टिका होत असल्याने अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshawardhan Sapkal) यांनी शिवप्रेमींची दिलगिरी व्यक्त केली आहे. शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची आपण तुलना केली नसल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. शिवरायांच्या कर्तृत्वापासून प्रेरणा घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला,असं हर्षवर्धन सपकाळ यांचं म्हणणं आहे.आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच त्याबद्दल आपण दिलगिरी (Apology)व्यक्त करत असल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे.
नक्की वाचा: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची यशाला गवसणी;एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक
हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले? (Harshawardhan Sapkal)

“शिवप्रेमी बंधू-भगिनींनो, सप्रेम नमस्कार! सरकारी कार्यालयांमध्ये विविध महापुरुषांचे फोटो एकत्र लावल्याने समाजात तेढ निर्माण होणार नाही, तर ऐक्याचा संदेश जावा, या आशयाचे माझे ७० सेकंदांचे वक्तव्य होते. दुर्दैवाने, त्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घालण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण करण्यात आला”,असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
“भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला. त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला, हे आपण पुण्यात पाहिले आहे. मी पुन्हा एकदा स्पष्ट आणि ठामपणे सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. ते माझे आदर्श, प्रेरणास्थान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही, मी केलेली नाही”.
अवश्य वाचा: अजित पवारांच्या निधनानंतर ‘त्या’७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा कुणी दिला?
‘माझ्या शब्दाचा गैरवापर केला’ (Harshawardhan Sapkal)
“टिपू सुलतानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इंग्रजाविरूद्ध लढा दिल्याचे मी म्हटले होते. त्यांच्या योगदानाची दखल घेत थेट भारताच्या संविधानामध्ये देखील त्यांची तसबीर आहे. त्यांच्या प्रतिमेच्या संदर्भात समाजात तणाव वाढू नये, सर्वांनी परस्पर सन्मान आणि बंधुभाव जपावा, हा माझ्या वक्तव्याचा गाभा होता. इतिहासावर मतभेद असू शकतात, मात्र त्यावर अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी आणि समाजात संघर्ष निर्माण होऊ नये,जात-धर्म-पंथावर ध्रुवीकरण अजिबात खपवून घेता कामा नये, हीच भूमिका मी मांडली होती. या प्रकरणी भाजपचा तीव्र शब्दात निषेध करतो. त्यांच्या गलिच्छ खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दाचा गैरवापर केल्या बद्दल शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त करतो. कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता,” असं देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.


