
Cleanliness Campaign : नगर : संत गाडगे महाराज (Sant Gadge Maharaj) यांची जयंती २३ फेब्रुवारीला होणार आहे. या जयंतीचे औचित्यसाधत अहिल्यानगर महापालिका (Ahilyanagar Municipal Corporation), विचार भारती व पुण्यातील पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन (Ecovision Foundation) यांच्यातर्फे तसेच शहरातील सर्व नगरसेवक, आमी संघटना, क्रेडाई, एसएमई संस्था, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, अहमदनगर सीए संघटना, आयडीए, एईएसए आदी ३० सामाजिक संघटनांतर्फे शहरात सर्वात मोठे स्वच्छता अभियान (Cleanliness Campaign) राबविण्यात येणार आहे, अशी माहिती विचार भारतीचे मार्गदर्शक राजाभाऊ मुळे यांनी दिली. हे स्वच्छता अभियान शहरात सर्व ठिकाणी एकाच दिवसात मोठ्या प्रमाणात राबविले जाणार आहे.
नक्की वाचा : AI उजळणार अंध बांधवांचे जीवन; अहिल्यानगरमध्ये विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
बांग्लादेशी घोसखोरी विरोधात जनजागृती उपक्रम
हे अभियान स्वच्छ अहिल्यानगर-हरित अहिल्यानगर, सुसंस्कृत सांस्कृतिक कार्यक्रम, सुरक्षित अहिल्यानगर, स्वयं अनुशासित अहिल्यानगर, स्वयंरोजगार युक्त अहिल्यानगर, शासकीय योजना लाभित अहिल्यानगर या सहा मुद्द्यांच्या आधारावर असणार आहे. यात स्वच्छ अहिल्यानगर-हरित अहिल्यानगर मध्ये प्लास्टिक निर्मुलन, कापडी बॅग वापरण्यासाठी प्रोत्साहन, सीना नदी सुशोभिकरण आदी उपक्रम राबविण्यात येतील. सुसंस्कृत सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत डीजे मुक्ती, नवरात्रोत्सवात मातृशक्तीचा जागर, अहिल्यानगर गौरव दिन आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. सुरक्षित अहिल्यानगर यात सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, पोलीस संवाद व बांग्लादेशी घोसखोरी विरोधात जनजागृती उपक्रम होतील.
स्वयं अनुशासित अहिल्यानगरमध्ये चौकातील ट्रॅफिक सिग्नल नियम सांगणे, थुंकण्याबाबत प्रबोधन व सेल्फ रेग्युलेशन हे उपक्रम होणार आहेत.
अवश्य वाचा : वीटभट्टी कामगाराच्या मुलाची यशाला गवसणी;एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक
शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचविल्या जाणार (Cleanliness Campaign)
स्वयंरोजगार युक्त अहिल्यानगर मध्ये कृषी आधारित उद्योगाला चालना, अहिल्यानगर शहरातील तरुणांना त्यांच्याच शहरात रोजगार मिळावा यासाठीचे प्रयत्नांचा समावेश आहे. शासकीय योजना लाभित अहिल्यानगरमध्ये विविध शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. हा उपक्रम शहरात मोठ्या प्रमाणात राबविला जावा यासाठी विचार भारतीने महापालिकेत सर्व नगरसेवक व अधिकाऱ्यांची मागील आठवड्यात बैठक घेतली होती. या बैठकीत उपस्थित नगरसेवकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या अभियानात कॉम्प्युटर, लॅपटॉप, त्यांचे सुटे भाग, प्रिंटर, मॉनिटर, मोबाईल्स, चार्जर, बॅटरी, टीव्ही, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन, मिक्सर, फॅन, कॅमेरा, हेडफोन, स्पिकर यांसारखी आपल्याकडील बंद अथवा वापरात नसलेल्या इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक जमा केली जाणार आहेत. त्यासाठी शहरात ९ ठिकाणी सेंटर उभे करण्यात येणार आहेत.


