Crime | संगमनेर: तालुक्यातील धांदरफळ खुर्द गावात शिवजयंतीच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. ग्रामसभेदरम्यान घरी पाणी येत नसल्याचा प्रश्न मांडणाऱ्या युवकाला विरोधकांनी “तू काय प्रश्न मांडतोस, बघतो तुझ्याकडे” असे धमकावत लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार (Crime) दाखल करण्यात आली आहे.
अवश्य वाचा- राज्यात ११ अतिरिक्त जिल्हाधिकारी तर ६९ अतिरिक्त तहसील कार्यालये;राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप (Crime)
या घटनेत पियुष मारुती ठोंबरे यांनी तक्रार दिली असून, सतीश विश्वनाथ खताळ (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती) यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवजयंतीचे औचित्य साधून गावात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पियुष ठोंबरे यांनी आपल्या घरात नियमितपणे पाणी येत नसल्याची तक्रार ग्रामसभेत मांडली. मात्र, या प्रश्नावर समाधानकारक उत्तर देण्याऐवजी काही विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत धमकी देत मारहाण केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. ही घटना ग्रामसभेसारख्या लोकशाही मंचावर घडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामसभा ही नागरिकांच्या प्रश्नांसाठी असताना, प्रश्न मांडणाऱ्या युवकावर लाथाबुक्क्यांनी मारहाण होणे म्हणजे लोकशाही मूल्यांची पायमल्ली असल्याची भावना गावकऱ्यांतून व्यक्त होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, घटनेची गंभीर दखल घेत संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर गावातील वातावरण तणावपूर्ण झाले असून, संबंधितांवर कडक कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.



