Accident | लग्नाचं बाशिंग बांधण्यापूर्वीच तरुणावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांसह चालकाचा भीषण अंत

भरधाव ट्रकची कारला समोरून धडक

0

Accident | श्रीगोंदा: अहिल्यानगर-दौंड महामार्गावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. मंगळवारी (ता.२४) पहाटे ३ वाजेच्या सुमारास कोळगाव शिवारात झालेल्या एका भीषण अपघातात (Accident) अकोला जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील तिघांसह कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने केवळ चार जीव घेतले नाहीत, तर काष्टी येथील एका तरुणाच्या लग्नाच्या स्वप्नांचाही चक्काचूर केला.

अवश्य वाचा- सुजय विखे पाटील यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

भरधाव ट्रकची कारला समोरून धडक (Accident)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास कोळगाव शिवारातील माऊली मंदिराजवळ अकोला जिल्ह्यातील पायधन कुटुंब कारने काष्टी येथे येत असताना, नगरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने कारला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातातील सर्वात चटका लावणारी बाब म्हणजे कार चालक नितीन अनिल कोकाटे (वय २२) याचे पुढच्याच महिन्यात लग्न होते. घरात लग्नाची लगबग आणि आनंदाचे वातावरण असतानाच काळाने घाला घातला. ज्या हातात लग्नाची मेहंदी लागणार होती, त्याच हातांनी काळाला कवटाळण्याची वेळ आल्याने काष्टी गावावर शोककळा पसरली आहे.

नक्की वाचा- राजधानी दिल्ली हाय अलर्टवर, ISIशी संबंधित 8 संशयितांना अटक

अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार (Accident)

या भीषण अपघातात नितीन अनिल कोकाटे (२२, रा. काष्टी, श्रीगोंदा), गजानन जनार्दन पायधन ( वय ४६), द्रौपदा गजानन पायधन ( वय ३६), वैभव गजानन पायधन ( वय १९,  तिघे रा. मळसूर, जि. अकोला) हे जागीच मयत झाले तर या अपघातात १३ वर्षीय करण गजानन पायधन हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो या अपघातातील एकमेव वाचलेला सदस्य आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणकुमार लोखंडे आणि बेलवंडी पोलीस ठाण्याचे नंदकुमार सोनवलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला असून, संतोष नारायण जाधव यांच्या तक्रारीवरून बेलवंडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या पसार ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.