
Unauthorized Constructions : पाथर्डी : पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समिती (Pathardi Agricultural Product Market Committee) आवारातील काही व्यापाऱ्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत (Unauthorized Constructions) तीव्र संताप व्यक्त करत किसन आव्हाड यांनी प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा येत्या (ता. ४) मार्च पासून बाजार समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा (Hunger Strike Warning) त्यांनी दिला. यासंदर्भात त्यांनी बाजार समितीचे सभापती आणि सचिव यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर महानगरपालिकेकडून १४ मार्चपर्यंत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये १०० टक्के सवलत
जागेपेक्षा जास्त क्षेत्रात बांधकाम
या प्रकरणाची प्रती अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा उपनिबंधक सहकार कार्यालय आणि पाथर्डी सहाय्यक निबंधक सहकार विभाग यांना पाठवण्यात आल्या आहेत. निवेदनात किसन आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे की, बाजार समितीने अनेक व्यापाऱ्यांना मालकीच्या जागा आणि गाळे भाडेकराराने दिलेले आहेत. या करारात स्पष्ट अटी-शर्ती नमूद करण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्ष पाहणीत असे दिसून आले आहे की, अनेक व्यापाऱ्यांनी करारात नमूद केलेल्या जागेपेक्षा जास्त क्षेत्रात बांधकाम केले आहे. काही व्यापाऱ्यांनी मूळ जागेच्या आजूबाजूला पत्र्याचे शेड उभारले आहे. या शेडमध्ये पोटभाडेकरू ठेवून व्यवसाय चालवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
अवश्य वाचा : सास-याचा खुन करणारा जावई मित्रासह जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नियमबाह्य प्रकार उघडकीस आणावेत (Unauthorized Constructions)
मूळ भाडेकरारातील जागेचे तात्काळ मोजमाप करावे. अतिरिक्त आणि अनधिकृत बांधकाम त्वरित पाडण्यात यावे. पोटभाडेकरू कोणत्या अधिकृत आदेशाने किंवा परवानगीने ठेवण्यात आले आहेत, याची सखोल चौकशी करावी. संबंधित व्यापाऱ्यांचे भाडेकरार तपासून नियमबाह्य प्रकार उघडकीस आणावेत आणि संबंधितांवर योग्य कारवाई करावी. आव्हाड यांनी पुढे म्हटले आहे की, येत्या दहा दिवसांत प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही, तर (ता. ४) मार्च पासून ते बाजार समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसतील. उपोषणादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची पूर्ण जबाबदारी बाजार समिती प्रशासनावर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा : नागवडे कारखान्याला सव्वादोन कोटींचा दणका; घोड नदी प्रदूषण प्रकरणी हरित लवादाचा ऐतिहासिक निकाल
शेतकरी वर्गात मोठी खळबळ
या प्रकरणामुळे पाथर्डी बाजार समितीतील व्यापारी आणि शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. बाजार समिती आवारातील अनियमितता आणि नियमांचे उल्लंघन थांबवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. आता जिल्हास्तरीय प्रशासन या निवेदनावर काय भूमिका घेते आणि कारवाई कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


