
Shani Shingnapur : नगर : नेवासे (Nevasa) तालुक्यातील शनी शिंगणापूर (Shani Shingnapur) येथील श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमधील ३६३ कायम कर्मचारी प्रलंबित मागण्यासाठी ०२ मार्चपासून उपोषणास बसले आहेत. मागण्या मान्य न झाल्याने चौथ्या दिवशीही उपोषण (Hunger strike) सुरूच आहे.
हे वाचा : दोन दिवसांत दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण; अहिल्यानगर तालुक्यातील घटना
प्रशासनाशी चर्चा
दरम्यान नगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील, देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी काल उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्यासाठी चर्चा केली; पण लेखी आश्वासन न दिल्याने कामगार उपोषणावर ठाम आहेत. देवस्थानच्या कामगार संघटनेचे अध्यक्ष शामसुंदर शिंदे, सचिव अजित शेटे, उपाध्यक्ष राजेंद्र शेटे, संदीप दरंदले, सुदाम भुसारी, सुखदेव मनाळ हे पाच कर्मचारी शनिशिंगणापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर उपोषणास बसले आहेत. तर उर्वरित कर्मचारी साखळी पद्धतीने उपोषणास साथ देत आहेत.
नक्की पहा : खाकी विरुद्ध खाकी; एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसाकडून बेदम मारहाण!
देवस्थान कर्मचारी संघटनेने १६ फेब्रुवारी २०२६ रोजी नाशिक येथील विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे कामगारांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली होती. तसेच देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही संघटनेची चर्चा झाली होती. मात्र, मागण्यांवर तोडगा निघाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी उपोषणास्त्र उपसले आहे.
या आहेत मागण्या (Shani Shingnapur)
मागील वर्षीचा दिवाळीचा बोनस द्यावा, वेतन बदलातील फरक थकीत रकमेसहित देण्यात यावा, आदी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी श्यामसुंदर शिंदे यांची तब्येत खालावली असून, त्यांना सलाईन देण्यात आले. जिल्हा रुग्णालय व सोनई आरोग्य केंद्राच्या पथकाने सर्व उपोषणकर्त्याच्या आरोग्याची तपासणी केली.


