Shrirampur | श्रीरामपूर : श्रीरामपूर (Shrirampur) नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील चार स्वच्छता कर्मचाऱ्यांना जंतूनाशक पावडर फवारताना विषबाधेचा त्रास झाला. पावडरच्या उग्र वासाने मळमळ आणि चक्कर येऊ लागल्याने त्यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी मास्क आणि ग्लोव्हज वापरले असल्याचा दावा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. सध्या या सर्व कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. सुनील बागडे (वय ५०), चंद्रकांत दळवी (वय ५६), गोकुळ मारसाळे (वय ३४) आणि अरुण अस्वले (वय ३५) अशा चार कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
नक्की वाचा : बारडगावचा तरुण बनला आयआरएस अधिकारी; दुसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा केली उत्तीर्ण
तीन कर्मचारी कंत्राटी
श्रीरामपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागात स्वच्छतेचे काम करणाऱ्या य चार कर्मचाऱ्यांना काल सकाळी वॉर्ड क्र. ७ मधील बेलापूर रोड परिसरातील मसाले गल्ली भागात स्वच्छता करत असताना आणि विषारी औषध टाकतेवेळी वासाने चक्कर येऊ लागल्याने व मळमळ होऊ लागल्याने तातडीने मुकादम व नागरिकांनी त्यांना साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. यातील तीन कर्मचारी हे कंत्राटी असून एक कायम सेवेत आहे. त्यांना हातात हॅन्ड ग्लोज व तोंडाला मास्क दिलेले होते, आणि ते वापरूनच ते काम करत असल्याची माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी रावसाहेब घायवट यांनी दिली. आता त्यांची प्रकृती चांगली असल्याचेही आरोग्य अधिकारी घायवट यांनी सांगितले.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता त्याच जागेवर दुसऱ्यांदा या स्वरूपाची घटना घडली असल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामध्ये मेडिकल वेस्ट अथवा विषारीजन्य स्वरूपाचा काही कचरा टाकला जातो का? याची पालिका प्रशासनाने पाहणी करून आवश्यक उपाययोजना करावी
– कॉ. जीवन सुरुडे, सहचिटणीस
अ. नगर जिल्हा नगरपालिका कामगार कर्मचारी युनियन
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत झालेल्या प्रकाराची चौकशी सुरू असून, सध्या कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. नगरपालिका प्रशासन याबाबत गंभीर असून यामध्ये जर कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
– करण ससाणे,
नगराध्यक्ष


