Sangamner Municipality: संगमनेर पालिकेतर्फे ५० टक्के दंडात्मक व्याजात सवलत; थकबाकीदारांसाठी मोठी संधी

योजना फक्त ३१ मार्चपर्यंत लागू

0

Sangamner Municipality: संगमनेर: नगरपालिकेने (Sangamner Municipality) शहरातील थकबाकीदार नागरिकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. शासनाच्या निर्णयानुसार नगरपालिकेने ‘अभय योजना’ लागू केली असून, मे २०२५ पर्यंतची घरपट्टीची थकबाकी असणाऱ्या नागरिकांना दंडात्मक व्याजात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच ३१ मार्चपर्यंत दहा कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट (OBJECTIVE OF RECOVERY) असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. संगमनेर नगरपालिकेच्या दालनातील मीटिंग हॉल मध्ये मुख्याधिकारी गोरे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी कर अधिकारी श्वेता शिंदे, सहायक कार्यालयीन निरीक्षक राजेश गुंजाळ व आरोग्य निरीक्षक अमजद पठाण उपस्थित होते.

अवश्य वाचा- धक्कादायक! तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज यांनी स्वतःवरच केले वार…

योजना फक्त ३१ मार्चपर्यंत लागू (Sangamner Municipality)


मुख्याधिकारी गोरे म्हणाले की, अभय योजना फक्त ३१ मार्चपर्यंत लागू असेल. त्यानंतर ही सवलत मिळणार नाही. शासनाच्या नियमानुसार, चालू मागणी आणि थकबाकीवर प्रति महिना २ टक्के म्हणजेच वर्षाला २४ टक्के व्याज आकारले जाते. कायद्यातील तरतुदीनुसार या व्याज आकारणीत नगरपालिका स्वतःहून कोणताही बदल किंवा ठराव करून कपात करू शकत नाही. ज्या नागरिकांनी अद्याप आपला कर भरलेला नाही, त्यांच्यावर पालिकेतर्फे कडक पावले उचलली जात आहेत.

नक्की वाचाइतिहासातून शिका, अन्यथा पुनरावृत्ती अटळ : रामगिरी महाराज

थकबाकी असलेल्या मालमत्तांना सील ठोकण्याची कारवाई सुरू(Sangamner Municipality)


शहरात सध्या नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू आहे. थकबाकी असलेल्या व्यावसायिक गाळ्यांना आणि मालमत्तांना सील ठोकण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. दिनांक २० मार्च २०२६ नंतर मोठ्या थकबाकीदारांची नावे प्रभागनिहाय वर्तमानपत्रात, सोशल मीडियावर आणि संबंधित ठिकाणी फ्लेक्स लावून प्रसिद्ध केली जाणार आहेत. यात १ लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असणारे आणि काही भागात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्यांची यादी असेल. त्याचबरोबर दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत नगरपालिकेचे संकलित कराचे १० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ४ कोटी ८० लाख रुपये वसुली झाली असून कमीत कमी ७ कोटी पर्यंत वसुली होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शहराच्या विकासकामांसाठी आणि सोयीसुविधांसाठी नागरिकांनी आपला कर वेळेत भरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले आहे.