ADCC Bank : नगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे (ADCC Bank) ठेवीदारांनी मार्च २०२६ अखेर अकरा हजार ३११ कोटीच्या ठेवी (Deposit) ठेवून बँकेवर मोठा विश्वास दाखविला आहे. इतिहासात प्रथमच बँकेने ठेवीचा एवढा मोठा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर, जिल्ह्यातील शेतकरी सभासदांनी अडचणीच्या काळातही आपले कर्ज वेळेत भरले आहे तसेच बँकेची कर्ज वसुली ३४.४७ टक्के झाली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले (Chandrashekhar Ghule) यांनी दिली.
नक्की वाचा : ‘मुंबईत बॉम्बस्फोट होणार’ अशी खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या पारनेरच्या तरुणावर गुन्हा दाखल
जिल्हा बँक राज्यात डिजिटल सेवेमध्ये आघाडीवर
बँक ग्राहकांनी आपल्या पैशांची गुंवणूक जिल्हा बँकेत करुन बँकेवर मोठा विश्वास ठेवीच्या रुपाने ठेवला आहे. बँक ही ठेवीदारांना आकर्षक व्याजदर व सेवा देत आहे. जिल्हा बँक राज्यात डिजिटल सेवेमध्ये आघाडीवर आहे. त्याचबरोबर बँकेने गेल्या चार महिन्यापासून सोनेतारण कर्जासाठी खास उपक्रम राबवून शेतकरी व ग्राहकांना ८ टक्के व्याजदराने प्रती व्यक्ती ५ लाख कर्ज मर्यादा प्रमाणे सोनेतारण कर्ज उपलब्ध करुन देत असल्याने सोने तारण कर्जातही मोठी वाढ झाली आहे. मार्च २०२६ अखेर १४६ कोटीचे कर्ज वाटप झाले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
बँकेचा सिडी रेशो अतिशय चांगला (ADCC Bank)
सध्या बँकेच्या ११८ शाखांमध्ये सोनेतारण कर्ज सेवा उपलब्ध आहे. लवकरच १६० शाखांमध्येही सोनेतारण कर्ज सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती घुले पाटील यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, रिझर्व्ह बँकेच्या नॉर्म्स प्रमाणे जिल्हा बँकेचा सिडी रेशो अतिशय चांगला असून तो ६८.२२ टक्के आहे. हा रेशो बँकींग क्षेत्रात आदर्श समजला जातो, असेही त्यांनी सांगितले.
मोठ्या प्रमाणावर सेवा सोसायट्यांची वसुली
याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे यांनी सांगितले की, जिल्हा बँकेच्या या सहकार वर्षात पाच हजार ८३४ कोटीपैकी मार्च २०२६ अखेर पर्यंत दोन हजार ११ कोटीची कर्जदार सभासदांनी वसुली दिली. यापैकी एक हजार ८६३ कोटीची वसुली पिक कर्जाची आहे. शेतकरी सभासदांनी मोठ्या प्रमाणावर सेवा सोसायट्यांची वसुली दिली आहे. यामुळे सहकारी संस्थांसमोर निर्माण होणाऱ्या अडचणी काही प्रमाणात दुर झाल्या आहेत. शेतकरी सभासद व जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचकमिटी, सचिव तसेच बँकेचे सर्व अधिकारी व सेवक वर्ग यांचे कानवडे यांनी आभार व्यक्त केले.
वर्पे यांनी सांगितले की
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी सांगितले की, बँकेच्या संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा संस्थेचे पदाधिकारी, सचिव व बँक कर्मचारी यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. शाखेतील कामकाज सुट्टीच्या दिवशीही चालू ठेऊन शेतकरी बांधवांसाठी कर्ज भरणा करण्याची विशेष सुविधा बँकेने उपलब्ध करुन दिली. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी बँकेची कर्जवसुली दिली, त्याचप्रमाणे बँकही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पिक कर्ज उपलब्ध करुन देईल.



