Anjali Damaniya : नगर : भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात आता रोज नवीन माहिती समोर येथ आहे. या प्रकरणात राज्याच्या पोलीस दलातील उच्चपदस्थ आयपीएस (IPS) अधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) दत्ता कराळे यांच्यावर सोशल मीडिया पोस्टद्वारे निशाणा साधत थेट गंभीर आरोप केले आहेत.
नक्की वाचा : मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे लायसन्स रद्द होणार;’या’ दिवसापासून अंमलबजावणी
दमानियांची पोस्ट (Anjali Damaniya)
अंजली दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, “श्री दत्ता कराळे हे एक IG लेवलचे पोलीस अधिकारी असताना खारतांसारख्या बाबांच्या कार्यक्रमात का गेले? तेथे भाषण देखील दिले? हे जेव्हा सामान्य जनता ऐकते तेव्हा खारतांवर विश्वास का नाही बसणार? त्यांची देखील चौकशी departmental vigilance कडून झाली पाहिजे. त्यांचे देखील थोडे थोडके नाही तर तब्बल १८ कॉल आहेत. ह्याचे उत्तर पोलिस महासंचालक श्री सदानंद दाते सरांनी घेतले पाहिजे.”
तातडीने चौकशीची मागणी (Anjali Damaniya)
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे अशा भोंदू बाबाशी काय संबंध असू शकतात?” याची तातडीने चौकशी करण्याची मागणी दमानिया यांनी केली आहे. अशोक खरात याच्यावर भोंदुगिरी, जादूटोणा आणि लोकांच्या फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत. याशिवाय अनेक महिलांवर त्याने फसवणूक करून किंवा धमकावून लैंगिक अत्याचार केल्याचेही आरोप आहेत. आतापर्यंत त्याच्याविरोधात डझनभरहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. अशा वादग्रस्त व्यक्तीसोबत एका आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याचे नाव जोडले गेल्याने नाशिक पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
नक्की पहा : कोपरगाव शहर पोलीस स्टेशनकडून “ऑल आऊट ऑपरेशन”
पोलीसच जर अशा भोंदूगिरीला पाठबळ देत असतील, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे?” असा सूर आता उमटत आहे. अंजली दमानिया यांच्या या आरोपांनंतर अद्याप आयजी दत्ता कराळे किंवा पोलीस प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.



