Dr. Babasaheb Ambedkar Jayanti:कर्जत: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) कर्जत शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी लहान मुलांनी बुद्ध वंदना म्हंटली. यावेळी जय भीम, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या जय घोषणांनी परिसर भीमसैनिकांनी दणाणून सोडला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भास्कर भैलुमे मित्रमंडळ आणि मोटार मालक – चालक संघटना यांच्या सौजन्याने भारतीय रिजर्व्ह बँकेचे भव्य असे व्यासपीठ उभारण्यात आले होते.
अवश्य वाचा- खरातच्या कार्यक्रमात वरिष्ठ IPS अधिकाऱ्याची हजेरी; अंजली दमानियांचे गंभीर आरोप
विविध सामाजिक उपक्रम (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti)
कर्जत शहर आणि तालुक्यात महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सिद्धार्थनगर येथील आंबेडकर भवन येथे विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. शहरातील प्रत्येक प्रभागात यासह चौकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. सकाळी ९ वाजता शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन सिध्दार्थनगर येथे प्रथम प्रतिमा पूजन करीत बुद्ध वंदना झाली. तसेच बुद्धविहार येथे वंदनेचा कार्यक्रम संपन्न झाला. कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय रिजर्व्ह बँकेची प्रशासकीय इमारतीचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. सकाळी ११:३० वाजता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक संघटना यासह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जय भीम आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या जय घोषणांनी भीमसैनिकांनी परिसर दणाणून सोडला होता. जयंती उत्सवासाठी बसस्थानक परिसर निळ्या ध्वजाने सजला होता. भास्कर भैलुमे मित्रमंडळाच्यावतीने उपस्थितांना सरबत वाटप करण्यात आले. लहान मुले आणि तरुणाई यांनी आपल्या वाहनांस निळा ध्वज लावत भीमजयंती उत्सव साजरा केला. संध्याकाळी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्यावतीने मिरवणूक काढण्यात आली होती.



