Akshay Kardile | नगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर होताच ही निवडणूक पारंपरिक विरोधक अक्षय कर्डिले (Akshay Kardile) व तनपुरे यांच्यात होईल, असे कयास लावले जात होते. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींनी वेग घेतला अन् माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे टाळले. या निवडणुकीत राजकारण बदलून गेले आहे, असे राजकीय विश्लेषक सांगतात. तनपुरेंच्या या बदललेल्या भूमिकेमुळे काय झालंय चला जाणून घेऊ…
हे वाचा – रस्ता काँक्रिटीकरणाची मागणी; काम सुरु न झाल्यास ३० एप्रिलला बैठा सत्याग्रहाचा इशारा
हक्काचा मतदारसंघ फुटला (Akshay Kardile)
भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाल्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. नगर तालुका विधानसभा मतदारसंघाचे विभाजन झाल्यावर या तालुक्याचे भाग तीन वेगळ्या विधानसभा मतदारसंघांचे भाग झाले. यात राहुरी मतदारसंघाला नगर तालुक्याचा काही भाग व पाथर्डी तालुक्याचा काही भाग जोडला गेला. शिवाजीराव कर्डिले यांचा हक्काचा मतदारसंघ फुटला असला तरी त्यांनी राहुरीत वर्चस्व असलेल्या तनपुरेंविरोधात निवडणूक लढवली. २००९, २०१४, २०१९ व २०२४ अश्या चार निवडणुका त्यांनी तनपुरे कुटुंबियांविरोधात लढवल्या. या निवडणुकांपैकी केवळ एक म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत तनपुरे कुटुंबाला यश मिळवता आले. उर्वरित तीन वेळा कर्डिले यांनी तेल लावलेल्या पैलवाना प्रमाणे विरोधकांना राजकीय आखाड्यात अस्मान दाखवले. हिंदुत्व व समाजाशी जोडलेली नाळ ही त्यांच्या विजयाची गुरुकिल्ली होती. हीच गुरुकिल्ली त्यांनी त्यांच्या मुलालाही दिली.
अवश्य वाचा- खरातच्या कार्यक्रमात वरिष्ठ IPS अधिकाऱ्याची हजेरी; अंजली दमानियांचे गंभीर आरोप
महाविकास आघाडीत एकमत नसल्याची चर्चा (Akshay Kardile)
शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपने मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकीय खेळी करत प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी अर्ज दाखल न करण्यासाठी मन वळविल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या प्रचार यंत्रणेत हत्तीचे बळ संचारले आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने कर्डिलेंचे विरोधक असलेल्या गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी बंड करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीत एकमत नसल्याची चर्चा आहे.
विखे, राजळे साथीला (Akshay Kardile)
शिवाजीराव कर्डिले यांचे जुने कार्यकर्ते अक्षय कर्डिले यांच्या समवेत ठामपणे दिसत आहेत. त्यांना विखे गटाकडून राहुरीतील सात्रळ, गुहा, धानोरे, निंभेरे, वरशिंदे, ताहराबाद, गणेगाव, चिंचविहिरे अशा राहुरी तालुक्यातील मोठ्या भागातून साथ मिळत आहे. तर आमदार मोनिका राजळे यांच्यामुळे पाथर्डी तालुक्यातील गावांतून साथ मिळत आहे. यातच कर्डिलेंचे हक्काचे नगर तालुक्यातील कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आहेत. तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने व इतर सहा उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचा फायदा कर्डिले यांना होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषक सांगतात. याबाबत तुम्हाला काय वाटते, कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि अशाच माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करा.
बहिणीही प्रचारासाठी मैदानात (Akshay Kardile)
अक्षय कर्डिले यांना चार बहिणी आहेत. त्यातील तीन बहिणी अहिल्यानगर शहरातील राजकारणात आहेत. त्यातील एक बहीण महापौर, एक माजी उपमहापौर त एक माजी नगरसेविका आहे. त्यांच्या चारही बहिणी अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यांचे मेहुणे आमदार संग्राम जगतापही प्रचारात सक्रिय आहेत. त्यांच्या दांडग्या जनसंपर्काचा फायदा अक्षय कर्डिले यांनी होईल. शिवाय अक्षय कर्डिले यांच्या पत्नी प्रियंका कर्डिले याही प्रचारात सक्रिय झाल्या आहेत. शिवाजीराव कर्डिले यांची कामे, त्यांच्या आठवणी व अक्षय कर्डिले करत असलेल्या कामांच्या जोरावर कर्डिले समर्थक मतदारांना मताचे दान मागत आहेत.



